मुंबई, दि. १९ मे २०२०: केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री हरदीप पुरी यांनी आज जाहीर केलेल्या कचरामुक्त शहरांच्या नव्या यादीमध्ये नवी मुंबईला फाईव्ह स्टार रेटिंग देण्यात आले आहे. सूरत, राजकोट, इंदूर, म्हैसूर आणि छत्तीसगडमधील अंबिकापूर यांनाही कचरामुक्त शहरांचे फाईव्ह स्टार रेटिंग मिळाले आहे. भारतातील स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये नवी मुंबईचा सातत्याने समावेश होत आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या २०१९ च्या आवृत्तीत नवी मुंबईचा ७ वा क्रमांक होता.
शहरांना कचरामुक्त दर्जा मिळवून देण्यासाठी आणि शहरे अधिकाधिक स्वच्छ बनण्यास प्रवृत्त करण्याच्या दिशेने संस्थात्मक यंत्रणा तयार करण्यासाठी मंत्रालयाने जानेवारी १२०१८ मध्ये स्टार रेटिंग प्रोटोकॉल सुरू केला होता.
शहरी भारतासाठी पाच वर्षांपूर्वी सुरु केलेले स्वच्छ सर्वेक्षण हे वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण अभियान अत्यंत यशस्वी झाले; तथापी, ही एक मानांकन पद्धत असल्याने, खूप चांगली कामगिरी करूनही आपली बरीच शहरे योग्यप्रकारे ओळखली जात नव्हती. म्हणूनच मंत्रालयाने कचरा मुक्त शहरांसाठी स्टार रेटिंग देण्याची नियमावली तयार केली, म्हणजे अशी एक व्यापक रचना ज्यात प्रत्येक शहरातील प्रत्येक प्रभागात घनकचरा व्यवस्थापनाच्या (एसडब्ल्यूएम) २४ विविध घटकांपैकी निश्चित मानक प्राप्त करणे आवश्यक आहे आणि प्राप्त झालेल्या एकूण गुणांच्या आधारे ती शहरे श्रेणीबद्ध केली जातात अशी माहिती हरदीपसिंग पुरी यांनी माध्यमांना दिली.
नाले व जलसंचयांची स्वच्छता, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, बांधकाम आणि पडलेल्या ढिगाऱ्याचे व्यवस्थापन इत्यादी कचरामुक्त शहरांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच्या महत्वपूर्ण निकषांवर ही स्टार रेटिंग नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीचा मुख्य भर घनकचरा व्यवस्थापनावर असला तरी, त्या चौकटीत परिभाषित केलेल्या पूर्वतयारींच्या संचाच्या माध्यमातून स्वच्छतेची काही विशिष्ट मानकांची खात्री करण्याची काळजी यात घेण्यात आली आहे. याअंतर्गत २०२० च्या सर्वेक्षणानुसार, ६ शहरांना फाईव्ह स्टार रेटिंग, ६५ शहरांना थ्री स्टार रेटिंग तर ७० शहरांना वन स्टार रेटिंग दिले गेले आहे.
चंद्रपूर, धुळे, जळगाव, जालना, ठाणे आणि मीरा-भाईंदर यासह महाराष्ट्रातील ३४ शहरांना ३ स्टार रेटिंग देण्यात आले आहे, तर अहमदनगर, अकोला, नाशिक, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवली यासह ४१ शहरांना वन स्टार रेटिंग देण्यात आले आहे.
एकत्रितपणे १,४३५ शहरे / शहरी स्थानिक संस्थांनी स्टार रेटिंग मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. मूल्यांकनादरम्यान, १.१९ कोटी नागरिकांचे अभिप्राय आणि १० लाखांपेक्षा जास्त जिओ-टॅग चित्रे संग्रहित केली गेली आणि ५१७५ घनकचरा प्रक्रिया प्रकल्पांना १२१० प्रत्यक्ष स्थळाला मूल्यांकनकर्त्यांनी भेट दिली.
६९८ शहरांनी डेस्कटॉप मूल्यांकन निश्चित केले, तर फील्ड मूल्यांकन दरम्यान १४१ शहरे स्टार रेटिंगसह प्रमाणित केली गेली आहेत. “प्रमाणपत्राची कमी संख्या ही नियमावलीची कठोर आणि भक्कम प्रमाणपत्र प्रक्रिया दर्शवते”, असे केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी सांगितले.
२०१४ मध्ये सुरुवात झाल्यापासून स्वच्छ भारत अभियानाने-शहरी (एसबीएम-यू) स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन या दोन्ही क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. ६६ लाख वैयक्तिक घरगुती शौचालये आणि ६ लाखांहून अधिक सामुदायिक/सार्वजनिक शौचालये बांधली गेली आहेत किंवा बांधकाम चालू आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात, ९६% प्रभागांत घरोघरी जाऊन संकलन करण्याचे १००% काम झाले आहे तर एकूण कचऱ्यापैकी ६५% कचर्यावर प्रक्रिया केली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी