महाकुंभमेळ्यात विमानभाड्यांची लूट

24

पुणे २८ जानेवारी २०२५ : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या लाखो भाविकांना अडचणीत आणत काही विमान कंपन्यांनी तिकिटांच्या दरात प्रचंड वाढ केली आहे. विमानभाड्यांमध्ये २०० टक्क्यांपासून थेट ७०० टक्क्यांपर्यंत वाढ करून भाविकांची लूट सुरू असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेतील विहिंप नेते विनोद बन्सल यांनी केला आहे.

“महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला पोहोचणाऱ्या भाविकांना विमान कंपन्यांनी अशा प्रकारे लुटणे हे अन्याय्य आणि अनैतिक आहे. उत्तर प्रदेश सरकार भाविकांच्या सोयीसाठी अहोरात्र कार्यरत असताना विमान कंपन्या मात्र प्रवाशांच्या गरजांचा गैरफायदा घेत आहेत. भाविकांवरील हा आर्थिक अन्याय सरकारला मान्य होऊ नये,” असे विहिंपचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी ठणकावून सांगितले.

विहिंपच्या तक्रारीनंतर नागरी उड्डाण नियामक मंडळ (डीजीसीए) सक्रिय झाले असून, विमान कंपन्यांना भाड्यांमध्ये तर्कसंगत बदल करण्याचे आदेश दिले आहेत. “महाकुंभ हा श्रद्धेचा आणि भक्तीचा महोत्सव आहे. अशा वेळी आर्थिक शोषण करणाऱ्या कंपन्यांविरोधात कठोर कारवाई करावी,” अशी मागणी विहिंपने केली आहे.

दरम्यान, प्रयागराजच्या दिशेने प्रवास करणाऱ्या भाविकांमध्ये या भाडेवाढीमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. “भाविकांची श्रद्धा, परंपरा आणि भावनिक बांधिलकीचा गैरफायदा घेणाऱ्या कंपन्यांना त्वरित रोखले गेले नाही तर भाविकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल,” असा इशाराही संघ परिवाराने दिला आहे.

ही वाढलेली विमानभाड्यांची समस्या लवकर सुटली नाही तर महाकुंभमेळ्यातील लाखो भाविकांच्या श्रद्धेला धक्का पोहोचण्याचा धोका आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा