मुंबई, १४ डिसेंबर २०२२ : क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणार्या सचिन तेंडुलकरच्या मुलाने म्हणजेच अर्जुननेही जबरदस्त सुरवात केली आहे. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अर्जुनने देखील रणजी क्रिकेटमध्ये शतकी खेळी साकारली आहे. पदार्पणातच शतकी खेळी खेळल्याने, त्याचे क्रिकेट चाहत्यांकडून प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. गोवा आणि राजस्थान यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात गोव्याकडून खेळताना अर्जुन तेंडुलकरने शतक ठोकले आहे. यासोबतच वडील सचिन तेंडुलकरच्या कामगिरीची बरोबरी केली आहे.
सचिन तेंडुलकरने १९८८ मध्ये गुजरातविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मुंबईकडून खेळताना सचिनने पहिल्याच डावात शतक झळकावले होते. तेव्हा सचिन फक्त १५ वर्षांचा होता.
दरम्यान, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गोव्याच्या संघाने पाच बाद २१० धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यावर अर्जुन तेंडुलकरने सुयश प्रभुदेसाई सोबत जबरदस्त भागीदारी केली. त्याचप्रमाणे अर्जुन तेंडुलकरने १७८ चेंडूत शतक पूर्ण केले. तर कालचा नाबाद चार धावांवरून पुढे खेळणाऱ्या अर्जुनने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केले. त्याला साथ देत सुयश प्रभू देसाईने ही राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई करत स्वतःचे दीड शतक पूर्ण केले. तर अर्जुनने शतक पूर्ण करत असताना १२ चौकार आणि २ षटकार मारले.
अर्जुनने विविध वयोगटात मुंबईचे प्रतिनिधित्व केले असून देखील त्याला रणजी संघात स्थान मिळवणे कठिण जात होते. अर्जुनने मुंबईकडून मुश्ताक अली टी २० स्पर्धेचे काही सामने खेळला आहे. त्याची मुंबईच्या रणजी संघात देखील निवड झाली होती. मात्र त्याला गेल्या हंगामात अंतिम ११ च्या संघात संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याने गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला. अर्जुनने यंदाच्या मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीत गोव्याचे प्रतिनिधित्व केले. आता रणजी ट्रॉफीत दमदार पदार्पण करत आपली गुणवत्ता दाखवून दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे