- गोळाभात
साहित्य : तांदूळ, चण्याचं पीठ (बेसन), धणेकूट, जिरेकूट, तिखट, हळद, मोहरी, हिंग, मीठ, तेल (गोडेतेल)
कृती : प्रथम गोळे बनवण्यासाठी चण्याच्या डाळीचा भरडा (जाड दळलेलं पीठ) घ्या. त्यात हळद, तिखट, मीठ, ओवा, हिंग, धणेकूट, जिरेकूट, तेलाचे मोहन घाला. त्याला घट्ट भिजवून त्याचे मुठीमध्ये दाबून गोळे बनवा. भात शिजवायला ठेवा. थोडा शिजू द्या व पाणी आटू द्या. त्यावर तयार केलेले गोळे टाकून पुन्हा भात शिजू द्या.
सजावट : भात वाढल्यावर त्यावर गोळा कुस्करून वाढा. त्यावर हिंगाची फोडणी घाला. आता गरम गरम गोळाभात खायला द्यावा.
- सुरळीच्या वड्या
या पाटोळ्यांसाठी तीन प्रकारचे मसाले तयार करावे लागतात.. साहित्य सारणासाठी : सारण मसाला- कांदे २ मध्यम आकारचे, १ वाटी बटाट्याचा कीस, खसखस १ चमचा, तीळ १ चमचा, धणेपूड १/२ चमचा, गोडा मसाला पाव चमचा, मीठ गरजेनुसार, तेल गरजेनुसार.
ब) पाटोळी मसाला १ वाटी बेसन, लसूण पाकळ्या ३ ते ४, जिरे १/२ चमचा, लाल मिरची पावडर १ चमचा, हळद चिमूटभर, मीठ गरजेनुसार, तेल गरजेनुसार.
क) रस्सा मसाला : कांदे २ मध्यम आकाराचे, १ वाटी खोबऱ्याचा कीस, लसूण पाकळ्या ३ ते ४, लाल मिरची पावडर १ चमचा, हळद चिमूटभर, धणेपूड १/२ चमचा, गोडा मसाला पाव चमचा, मीठ गरजेनुसार, तेल गरजेनुसार.
सारणाचा मसाला : सारणाचा तयार मसाला प्रथम कांदे किसून घ्यावे व ते तव्यावर लाल होईपर्यंत परतून घ्यावे, नंतर त्यात किसलेले सुके खोबरे टाकून कांद्यासोबत परतून घ्यावे. नंतर त्यात खसखस, तीळ, मीठ, धणेपूड, गोडा मसाला टाकावा. वरून थोडे तेल टाकावे. सर्व एकजीव होईपर्यंत परतून घ्यावे. हा सारणाचा मसाला तयार झाला.
ब) पाटोळ्या मसाला : पाटोळी तयार मसाला, लसूण पाकळ्या, जिरे, लाल मिरची पावडर, हळद, मीठ सर्व एकत्र करून मिक्सरमधून बारीक करावे.
क) रस्सा मसाला : रस्सा तयार मसाला- प्रथम कांदे भाजून घ्यावे, खोबऱ्याचा कीस तव्यावर भाजून घ्यावा. मग भाजलेले कांदे, खोबऱ्याचा कीस, लसूण, लाल मिरची पावडर, हळद, गोडामसाला, धणेपूड हे सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक करावे.
कृती- १. पाटोळ्या : कढईमध्ये तेल टाकून त्यात पाटोळ्या मसाला टाकावा. नंतर त्यात १ वाटी पाणी घालावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यात १ वाटी बेसन घालावे व ते चमच्याने ढवळत राहावे. (घेरून घ्यावे) नाही तर त्यात गुठळ्या पडण्याची शक्यता असते. पाण्याची गरज वाटल्यास गरम पाणी वापरावे. सारण भरताना-नंतर मऊसर शिजल्यावर तेलाचा हात लावून त्याचे छोटे गोळे करावे व ते चपातीसारखे लाटून घ्यावे. नंतर सारणाचा मसाला पसरवून फोटोत दाखवल्याप्रमाणे घडी करून घ्यावी व सुरीने छोटे-छोटे तुकडे करून घ्यावे.
रस्सा : रश्श्यासाठी तयार केलेला मसाला कढईत तेलात परतून घ्यावा. त्यात थोडे बाजरीचे पीठ घालावे, म्हणजे रस्सा दाट होईल. चवीपुरते मीठ घालावे. गरजेपुरते पाणी घालावे. मंद आचेवर ५ मि. शिजू द्यावे. वरून कोथिंबीर टाकून सर्व्ह करावे. तयार पाटोळी तयार
रस्सा – टीप : पाटोळ्या नुसत्याच छान लागतात किंवा रश्श्यात टाकून गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर खाव्यात.
- नागपुरी वडाभात
दोन वाट्या चांगल्या तांदळाचा मोकळा भात करा. त्यात मीठ घाला. वड्यासाठी : अर्धा वाटी प्रत्येकी वेगवेगळ्या डाळी, चण्याची डाळ, तूरडाळ, सालासहित मूगडाळ, उडीद डाळ, मसूर डाळ, मटकीची आणि
चवळीची डाळ. (मटकी व चवळी डाळ न मिळाल्यास अख्खी घ्यावी). सर्व डाळी चार-पाच तास भिजत घालून ठेवा. पाण्यातून निथळून मिक्सरमधून एकत्र जाडसर वाटून घ्या. त्यात चिरलेला कढीपत्ता, चिरलेली कोथिंबीर, आलं-लसणाची पेस्ट, दोन चमचे धणे-जिऱ्याची पूड, एक चमचा जिऱ्याची पूड, हळद, तिखट, मीठ व गरम तेलाचं मोहन घालून हातावर छोटे चपटे वडे बनवा आणि त्यात मधे छिद्र पाडून तेलात खरपूस लालसर रंगावर तळा. वाढताना भात वाढून घ्या. त्यावर तीन-चार वडे कुस्करून घाला त्यावर तेलाची हिंग, कढीपत्ता घालून केलेली फोडणी व थोडं तेल आणि लाल तिखट घाला. भिशीला वडाभात करायचा असेल तर एका भांड्यात मोकळा भात आणि दुसऱ्या भांड्यात वड्याचे तुकडे करून ठेवा. एक छोट्या बाऊलमध्ये लसूण व लाल मिरच्यांची खमंग फोडणी, लाल तिखट, चिरलेली कोथिंबीर, तळलेले पापड, दही-बुंदी व भाताबरोबर चिंचेचं आंबटगोड सार असा मस्त बेत होतो.