लाहोर १९ जून २०२३ : पाकिस्तान सध्या अनेक आर्थिक वितुष्टांचा सामना करत पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. महागाई, भ्रष्टाचार, दहशतवाद, बेरोजगारी, आर्थिक संकटात पाकिस्तान पूर्णतः होरपळून निघालाय. पाकिस्तानची खरी सत्ता ही आयएसआयच्या हातात असते, हे आजवर जगजाहीर आहे. ते जेव्हा ठरवतील तेव्हा पाकिस्तानात सत्तापरिवर्तन करतात. आजपर्यंतच्या इतिहासात पाकिस्तानात कोणालाही सत्तेची पाच वर्ष पूर्ण करता आलेली नाही. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी, भ्रष्टाचाराचे आरोप असलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना, परत येऊन पुन्हा पंतप्रधान होण्याची साद घातली आहे.
पाकिस्तानचे सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची पीएमएल-एन या पक्षाच्या अध्यक्षपदी चार वर्षांसाठी निवड करण्यात आली, यावेळी बोलताना, त्यांनी नवाज शरीफ यांची आठवण काढली. शहबाज शरीफ यांनी नवाज शरीफ यांना पाकिस्तान येण्याचे आवाहन केले तसेच त्यांना पंतप्रधान बनण्याची ऑफर दिली. जर नवाज शरीफ पाकिस्तानात आले, तर मी पंतप्रधानपद सोडून देईन, असे शहबाज शरीफ म्हणाले.
पक्षांतर्गत झालेल्या निवडणुकांवेळी शहबाज शरीफ म्हणाले की, नवाज शरीफ चौथ्यांदा पंतप्रधान झाल्यास, देशाची प्रगती होवून देश अधिक समृद्ध होईल. पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका मागच्यावर्षी होणार होत्या. परंतु त्याची मुदत वाढवण्यात आली. आता झालेल्या निवडणुकांमध्ये नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांची वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
शहबाज शरीफ म्हणाले की, नवाज शरीफ आधुनिक पाकिस्तानचे निर्माते होते. त्यांच्या कार्यकाळात ऊर्जा क्षेत्रात भरभराट झाली. रस्त्याचे जाळे उभारले गेले. कृषि, उद्योग आणि अर्थव्यवस्थेच्या इतर महत्वपूर्ण क्षेत्रांचा विकास झाला.
शरीफ या वेळी म्हणाले की, सरकारने देशाच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी आंतरराष्टीय मु्द्रा कोषच्या सर्व अटींची पूर्तता केली आहे. त्यांनी याचीही आठवण करुन दिली की देश जेव्हा महागाईशी लढत होता तेव्हा, पीएमएल-एन ने आपले पार्टी फंड महागाईविरुध्द खर्च करून सामान्य लोकांना कठिण आर्थिक परिस्थितीत सुध्दा दिलासा दिला. कर्मचार्यांच्या पगारात ३५ टक्के तर पेंशनमध्ये १७ टक्के वाढ करण्यात आल्याचेही शरीफ यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर