मॉरिशसचे परराष्ट्रमंत्री ॲलन गानू यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई, ८ मार्च २०२३ : मॉरिशसचे परराष्ट्रमंत्री ॲलन गानू यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छ भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मॉरिशस आणि भारत या दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांपासूनचे मैत्रीचे संबंध आहेत. हे संबंध अधिक दृढ होण्यासाठी सांस्कृतिक देवाणघेवाण होणे गरजेचे आहे.

मॉरिशसमधील मराठी बांधवांसाठी आणि मराठी संस्कृतीच्या जतन आणि संवर्धनासाठी नक्कीच भरीव सहकार्य करण्यात येईल. विविध क्षेत्रांतील परस्पर सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्यासाठीही भरीव प्रयत्न करण्यात येतील. सहकार्याची नवीन क्षेत्रे शोधण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

मॉरिशसमध्ये मराठी बांधव मोठ्या प्रमाणावर आहेत. विविध उपक्रमांद्धारे ते मराठी संस्कृतीचे जतन करीत आहेत असे ॲलन गानू यांनी सांगितले. विविध क्षेत्रांतील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांचीही मॉरिशसला गरज असल्याचेही गानू यांनी सांगितले. मॉरिशस येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावेळी निमंत्रित करण्यात आले होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा