छेडछाड प्रकरणी भाजपच्या माजी आमदारास मारहाण, कान पकडून मागितली माफी

वाराणसी, ११ जानेवारी २०२१: उत्तर प्रदेशच्या वाराणसीत छेडछाड केल्याच्या आरोपावरून भाजपाच्या एका माजी आमदाराला मारहाण केली गेली आणि माफी मागवून घेतली. यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे प्रकरण वाराणसीच्या चौबेपूर पोलिस स्टेशन परिसरातील भगतुआ गावातील आहे. जेथे इंटर कॉलेजचे अध्यक्ष आणि भाजपचे माजी आमदार मायाशंकर पाठक यांच्यावर एका विद्यार्थिनीने अश्लील कृत्याचा आरोप केला होता.

पीडित विद्यार्थिनीच्या आरोपाची माहिती मिळताच तिचे कुटुंब संतापले. या परिवाराने महाविद्यालयात भाजपचे माजी आमदार मायाशंकर पाठक यांना मारहाण केली आणि त्याचा व्हिडिओही बनविला. वाराणसी पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

माया शंकर पाठक एकेकाळी वाराणसीत भाजपाचे आमदार होते आणि आता एमपी संस्था आणि संगणक महाविद्यालयाच्या नावाखाली इंटर कॉलेज भगतुआ या गावात चालवित आहेत. असे सांगितले जात आहे की, व्हिडिओ २ दिवसांपूर्वीचा आहे. भाजपचे माजी आमदार आणि शाळेचे अध्यक्ष मायाशंकर पाठक यांनी एका विद्यार्थिनीला आपल्या कार्यालयात बोलावले आणि तिच्याशी अभद्र वर्तन केले, असा आरोप आहे.

यानंतर मुलीने घरी येऊन आपल्या घरातील सदस्यांना सांगितले, संतप्त कुटुंबीयांनी शाळेत धाव घेतली आणि प्रथम माया शंकर पाठक यांना त्यांच्या कार्यालयात मारहाण केली आणि नंतर मैदानाबाहेर खुर्चीवर बसून पुन्हा मारहाण केली. मारहाणीदरम्यान, भाजपचे माजी आमदार वारंवार अपले कान पकडून आपल्या चुकीबद्दल क्षमा मागताना दिसतात.

दोन्ही बाजूंनी पोलिसांकडे तक्रार केली नसली तरी, व्हिडिओ खूप व्हायरल झाल्यामुळे आणि हाय प्रोफाइल प्रकरण असल्याने पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून त्याचा तपास सुरू केला आहे. या संदर्भात कार्यक्षेत्र अधिकारी पिंडरा अभिषेक कुमार पांडे यांनी सांगितले की, “अद्याप दोन्ही पक्षांपैकी कोणीही तक्रार केली नाही, परंतु व्हिडिओ तपासून सत्यता शोधली जात असून सर्व शक्य कायदेशीर कारवाई केली जाईल.” माया शंकर पाठक यांनी १९९१ मध्ये वाराणसीच्या चिरागाव विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा