पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचं निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पंजाब, २६ एप्रिल २०२३: पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचं निधन झालंय. त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शिरोमणी अकाली दलाचे संस्थापक प्रकाशसिंग बादल यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळं त्यांना १६ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं.

त्यांचा मुलगा सुखबीर सिंग बादल यांच्या स्वीय सहाय्यकाने ही माहिती दिली. त्यांचं पार्थिव बुधवारी सकाळी १० ते १२ या वेळेत चंदीगड येथील शिरोमणी अकाली दलाच्या मुख्यालयात ठेवण्यात येणार आहे. येथे लोकांना त्यांचं अंतिम दर्शन घेता येईल.

प्रकाश सिंह बादल यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने २ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. गेल्या वर्षी जानेवारीतही कोविडची त्यांना लागण झाली होती. त्यामुळं त्यांना लुधियाना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढील महिन्यात त्यांना मोहालीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

वयाच्या २० व्या वर्षी त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. १९५७ मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. १९७२, १९८९ आणि २००२ मध्ये ते विरोधी पक्षनेतेही होते. ते १० वेळा विधानसभेवर निवडून आले. १९९५ ते २००८ या काळात ते शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्षही होते. यानंतर त्यांचे पुत्र सुखबीर सिंग बादल हे पक्षाचे प्रमुख आहेत. २०१५ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा