काँग्रेसचे माजी आमदार आसिफ खान यांना अटक

नवी दिल्ली, २६ नोव्हेंबर २०२२ : काँग्रेसचे माजी आमदार आसिफ मोहम्मद खान कायमच वादात सापडणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यातच आता आसिफ मोहम्मद खान यांना एका व्हायरल व्हिडिओमध्ये एसआयसह दोन दिल्ली पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शाहीनबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आसिफ खान यांनी एका उपनिरीक्षकाला शिवीगाळ केली, आणि त्याला मारहाणही केली. शिवाय, असिफ खान यांनी पोलिस कर्मचाऱ्याला सर्वांसमोर धडा शिकविण्याची धमकी दिली होती.

पोलिस उपायुक्त ईशा पांडे यांनी या घटनेबद्दल माहिती देताना सांगितले, की मुलगी अरीबा खान यांच्या प्रचारासाठी आसिफ मोहम्मद खान यांनी एक सभा बोलावली होती. या सभेत भाषण करीत असताना तेथे पोलिस उपनिरीक्षक आले आणि त्यांनी खान यांना या सभेसाठी तुम्ही परवानगी घेतली आहे का? असा प्रश्न विचारला होता. यावर खान यांनी पोलिस उपनिरीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की करण्यास सुरवात केली.

दरम्यान, आसिफ खान आणि त्यांच्या समर्थकांनी घेरलेल्या दोन पोलिसांनी आपला जीव वाचवून तेथून पळ काढला होता. आसिफ खान यांच्या या कृत्यानंतर त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आज त्यांना अटक करण्यात आली. आसिफ खान यांच्या कृत्यावर भाजपनेही जोरदार टीका केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा