नवी दिल्ली, ४ जानेवारी २०२३ : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना बुधवारी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी सोनिया यांच्यासोबत मुलगी प्रियांका गांधी वढ्रादेखील उपस्थित असून, सोनिया गांधींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे प्रियांका यांनी म्हटले आहे.
पीटीआयच्या सूत्रांनी सोनिया गांधींना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशात सुरु आहे, मात्र यात्रेतून आज संध्याकाळी राहुल गांधी दिल्लीत दाखल होत रुग्णालयात आईची भेट घेणार आहेत. दरम्यान, सोनिया गांधी यांनी अलीकडे दिल्लीत पोहचलेल्या भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला होता. मुलगा राहुल गांधी यांच्यासोबत त्यांनी काही काळ पायी चालत गेल्या होत्या.
यापूर्वी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोविडची लागण झाल्यानंतर गेल्या वर्षी जून महिन्यात दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.