माजी राज्यपाल व भाजपचे ज्येष्ठ नेते केशरीनाथ त्रिपाठी यांचे निधन

4



प्रयागराज, ८ जानेवारी २०२३ ; उत्तर प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि पाश्चिम बंगालचे माजी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांचे प्रयागराज येथील राहत्या घरी आज पहाटे पाच वाजता निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. मागील बरेच दिवसांपासून ते आजारी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबर रोजी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना प्रयागराज शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना घरी आणले. मात्र, आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, केशरीनाथ त्रिपाठी हे गेल्या वर्षी ८ डिसेंबरला बाथरूममध्ये घसरुन पडले होते. या कारणामुळे त्यांच्या डाव्या खांद्याला फ्रॅक्चर झाले होते, तेव्हापासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते.

केशरीनाथ त्रिपाठी यांचा जन्म १० नोव्हेंबर १९३४ रोजी झाला. व्यवसायाने वकील असलेल्या केशरीनाथ त्रिपाठी यांची गणना भाजपच्या बलाढ्य नेत्यांमध्ये केली जाते. यूपीच्या राजकारणात त्यांची वेगळी ओळख असून, त्रिपाठी यांनी तीन वेळा यूपी विधानसभेचे अध्यक्षपद भूषविले आहे. या शिवाय, त्रिपाठी यांनी जुलै २०१४ ते जुलै २०१९ या कालावधीत पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा