जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन, भाषणादरम्यान झाला होता हल्ला

15

जपान, 8 जुलै 2022: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या करण्यात आलीय. आज सकाळी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. हल्ल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक होती. गोळी झाडल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला होता, यासोबतच त्यांचं खूप रक्तही वाहिलं होतं.

67 वर्षीय शिंजो आबे यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते, मात्र डॉक्टरांना यात यश आलं नाही. शिंजो आबे यांना गोळ्या घालणारा मारेकरी पकडला गेलाय. हल्ल्यानंतर लगेचच त्याला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आलं.

संशयित मारेकऱ्याचं वक्तव्यही समोर आलंय. जपानी पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोराने सांगितलं की त्याला शिंजो आबे यांना मारायचं आहे कारण तो शिंजो यांच्याशी अनेक गोष्टींवर समाधानी नव्हता.

संशयित मारेकऱ्याचं वय 41 च्या जवळपास आहे. त्याचं नाव यामागामी तेत्सुया आहे. हल्लेखोर सेल्फ डिफेन्स फोर्सचा सदस्य होता. घटनास्थळावरून ज्या बंदुकीतून हल्ला करण्यात आला, ती बंदूक जप्त करण्यात आलीय. ती शॉटगन आहे.

यामागामी तेत्सुया हा नारा शहरातील रहिवासी आहे. वृत्तानुसार, संशयित हा सागरी सेल्फ डिफेन्स फोर्समध्ये राहत होता. त्याने 2005 पर्यंत जवळपास तीन वर्षे तिथं काम केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान यामागामी तेत्सुयाने सांगितलं की, त्याला माजी पंतप्रधानांच्या काही गोष्टींचा राग होता आणि त्यांना मारायचं होतं.

हल्लेखोराने या हल्ल्याची आधीच योजना आखली असावी. कारण शिंजो आबे हे आज नारा शहरात येणार होते. गुरुवारीच लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने त्यांच्या समर्थकांना ही माहिती दिली.

शिंजो आबे निवडणुकीचा प्रचार करत होते

माजी पंतप्रधान जपानच्या नारा शहरात प्रचार करत असताना जपानमध्ये ही घटना घडली. रविवारी येथे वरिष्ठ सभागृहाची निवडणूक होणार आहे.

शिंजो आबे यांच्या भाषणादरम्यान हल्लेखोराने दोन गोळ्या झाडल्या. पहिली गोळी आबेंच्या छातीतून गेली. दुसरी त्यांच्या गळ्यावर लागली. यानंतर ते तिथं पडले आणि आजूबाजूला धावपळ झाली. दरम्यान, शिंजो यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर घटनास्थळी सीपीआर देऊन जीव वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर त्यांना एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांना वाचवता आले नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे