माजी कायदा मंत्री आणि ज्येष्ठ वकील शांती भूषण यांचे निधन

नवी दिल्ली, १ फेब्रुवारी २०२३ : भारताचे माजी कायदा मंत्री आणि ज्येष्ठ वकील शांती भूषण यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. दिल्ली येथील त्यांच्या राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचे ते वडील होते.

शांती भूषण हे वकिली शिवाय राजकारणातही चर्चेतील नाव होते. ते राज्यसभा खासदारही होते. शांती भूषण आणि त्यांचे पुत्र प्रशांत भूषणही आम आदमी पार्टीचे संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. त्यांनी २०१२ मध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आम आदमी पार्टीची स्थापना केली होती. मात्र कालांतराने हे दोघेही आम आदमी पार्टीपासून दूर झाले होते.

सन १९७७ ते १९७९ या दोन वर्षांच्या काळात त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात भारताचे कायदे मंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर १९८० मध्ये त्यांनी ‘सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन’ नावाची प्रसिद्ध एनजीओ स्थापन केली. या एनजीओच्या माध्यमातून त्यांनी अनेक महत्वाच्या जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केल्या.

  • पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

कायदेशीर क्षेत्रातील योगदान आणि वंचितांसाठी बोलण्याची तळमळ यामुळे शांती भूषण कायम लक्षात राहतील. त्यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना या दु:खातून बाहेर पडण्याचे बळ मिळो. ओम शांती, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांती भूषण यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा