माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचा फोन, धमकीचे फोन करणारा पोलिसांच्या ताब्यात

कराड, सातारा ३० जुलै २०२३ : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संभाजी भिडे यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच ठेवली आहे. संभाजी भिडे यांनी दोन दिवसांपूर्वी अमरावती येथे बोलताना महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. काँग्रेसकडून अमरावतीमध्ये राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच २४ तासात संभाजी भिडेंना अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.

भिडेंच्या या वक्तव्याचे विधिमंडळातही पडसाद पाहायला मिळाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा मुद्दा हा विधिमंडळात मांडला. या रागातून माजी मुख्यमंत्र्याना धमकीचे फोन करण्यात आले. माजी मुख्यमंत्र्यांना धमकीचे फोन करणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तसेच या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकुश सोराटे (नांदेड) असे या धमकीचे फोन करणाऱ्याचे नाव आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना कराडमधील राहत्या घरी धमकीचे फोन आले. या धमकीच्या फोननंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळात भिडेंच्या वक्तव्याचा मुद्दा मांडत अटकेची मागणी केली होती.

पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळात हा मुद्दा मांडला. अमरावतीत संभाजी भिडे या नावाच्या गृहस्थाने निंदाजनक वक्तव्य केले आहे. समाजामध्ये अशाप्रकारे तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीला अटक केली पाहिजे. ही व्यक्ती अनेक वर्षांपासून हा प्रकार करत आहे. ही व्यक्ती राष्ट्रपित्याबाबत असे वक्तव्य करू शकते. त्यामुळे बाहेर कसा फिरू शकतो? त्याच्या वक्तव्याचे पडसाद उमटल्यास जबाबदार कोण असेल?, असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे संभाजी भिडे यांना अटक करण्याची विनंती केली होती.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या या मागणीमुळे त्यांना अक्षय चोराडे याने धमकीचे फोन केले. मात्र काही वेळेनंतर पोलिसांनी या अक्षय चोराडेला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाई पोलिस करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा