पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे दुबईत निधन

इस्लामाबाद, ५ फेब्रुवारी २०२३ :पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन झाले आहे. ते ७९ वर्षांचे होते. पाकिस्तानच्या मीडियाच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. परवेज मुशर्रफ प्रदीर्घ काळ आजारपणामुळे त्रस्त होते. त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची परंतु, आज त्यांची प्रकृती जास्त खालावली असल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे.

  • नवी दिल्लीत झाला होता जन्म

११ नोव्हेंबर १९४३ रोजी परवेज मुशर्रफ यांचा जन्म दरीयागंज, नवी दिल्ली येथे झाला होता. १९४७ मध्ये त्यांच्या परिवाराने पाकिस्तानमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वडील सईद यांनी पाकिस्तान सरकारसाठी काम करण्यास सुरुवात केली आणि ते विदेशी मंत्रालयाशी जोडले गेले. परवेज मुशर्रफ यांचे शिक्षण कराची मध्ये झाले.

परवेज मुशर्रफ निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकारी होते. १९९९ साली पाकिस्तानचे लष्करप्रमुख असताना त्यांनी भारताविरूद्ध कारगील युद्ध पुकारले मात्र या युद्धामध्ये पाकिस्तानचा दारूण पराभव झाला. या युद्धाची कल्पना पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना देण्यात आली नव्हती. यावरून परवेज मुशर्रफ आणि नवाझ शरीफ यांच्यामध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले.

दरम्यान, परवेज मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी राष्ट्राध्यक्षांना अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील विशेष न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

  • देशद्रोहाचा गुन्हा दाखल

परवेज मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुशर्रफ यांच्यावर डिसेंबर २०१३ मध्ये ३ नोव्हेंबर २००७ रोजी देशात आणीबाणी लागू केल्याबद्दल आणि डिसेंबर २००७ च्या मध्यापर्यंत राज्यघटना निलंबित केल्याचा आरोप होता. याप्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३१ मार्च २०१४ रोजी मुशर्रफ यांना दोषी ठरवण्यात आले होते. मुशर्रफ यांनी १९९९ ते २००८ या कालावधील पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कारभार सांभाळला.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा