पुणे, २४ फेब्रुवारी २०२३ : भारताच्या प्रथम माजी महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह रणसिंह शेखावत यांचे आज निधन झाले आहे. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेखावत यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा धक्का आला होता. त्यानंतर त्यांना पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, आज सकाळी ९.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी ६ वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.
देवीसिंह रणसिंह शेखावत यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान होते. त्यांनी १९७२ मध्ये मुंबई विद्यापीठातून पीएचडी केली. तसेच विद्या भारती शिक्षण संस्था फाऊंडेशन संचालित महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते. ते महाराष्ट्र राज्य विधानसभेतील अमरावती मतदारसंघातून १९८५ ते १९९० या कालावधीसाठी निवडून आले होते. १९९५ च्या लढतीत त्यांनी त्यांची अनामत गमावली. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य देखील होते.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.