चंदीगढ, १६ ऑक्टोबर २०२२: पंजाब व्हिजिलन्स ब्युरोने एका मोठ्या कारवाईत माजी काँग्रेस मंत्री आणि भाजपचे विद्यमान नेते सुंदर शाम अरोरा यांना अटक केली आहे. रात्री उशिरा सुंदर शाम अरोरा यांना जिरकपूर येथून दक्षता विभागाने अटक केली आहे. अरोरा यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे.
याबाबत अधिक माहिती देताना दक्षता संचालक वरिंदर कुमार यांनी सांगितले की, सुंदर शाम अरोरा यांच्या वर दक्षता अधिकाऱ्याला ५० लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. रात्री उशिरा त्यांना जिरकपूर येथून पकडण्यात आले. अधिकाऱ्याला लाच दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरोरा यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
दरम्यान, दक्षता ब्युरो मागील काही दिवसांपासून माजी मंत्र्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेसह तीन प्रकरणांची चौकशी करत होती. या अंतर्गत सुंदर शाम अरोराविरुद्ध दोन खटले सुरू असून दक्षता पथकाने त्यांना दोनदा चौकशीसाठी बोलावले होते. दरम्यान, मंत्र्याला या प्रकरणात तुरुंगात जावे लागेल असे वाटत असताना त्यांनी या प्रकरणाचा तपास करणारे एआयजी मनमोहन सिंग यांना लाच देण्याची योजना आखली.
सुंदर शाम अरोरा कोण आहेत ?
अरोरा हे कॅप्टन अमरिंदर यांच्या सरकारमध्ये उद्योगमंत्री होते आणि त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर सलग दोन वेळा होशियारपूर विधानसभेची जागा जिंकली होती. २०१२ आणि २०१७ मध्ये त्यांची थेट लढत भाजप नेते टेकशन सूद यांच्याशी होती. त्याआधी, सूद यांनी १९९७, २००२ आणि २००७ मध्ये सलग तीन वेळा ही जागा जिंकली होती. काही दिवसांपूर्वीच अरोरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.