औरंगाबाद, ७ फेब्रुवारी २०२३ : हिलरी क्लिंटन, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या (यूएसए) माजी सचिव आणि १९९३ ते २००३ या कालावधीत अमेरिकेच्या फर्स्ट लेडी या आज मंगळवारपासून (ता. ७ फेब्रुवारी ते ता. ९ फेब्रुवारी) दोन दिवसांच्या महाराष्ट्रातील औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्या वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिराला भेट देणार आहेत. त्यामुळे त्या या दोन दिवसांत खुलताबाद तहसीलमध्ये राहणार आहेत. यादरम्यान त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. अहमदाबादहून खासगी विमानाने हिलरी क्लिंटन ७ फेब्रुवारीला औरंगाबाद विमानतळावर उतरतील. येथून त्या ध्यान फार्म्स, शहाजतपूर येथे जातील. ८ फेब्रुवारीला घृष्णेश्वर मंदिर आणि वेरूळ लेणीला भेट देणार आहेत आणि त्या ९ फेब्रुवारीला परतणार आहेत.
यावेळी विमानतळापासून ते शहरापर्यंत शहर पोलिसांकडून, तर ग्रामीण भागात ग्रामीण पोलिसांकडून त्यांचे संरक्षण केले जाणार आहे. ग्रामीण पोलिस दलात शंभराहून अधिक कर्मचारी आणि दहा ते पंधरा पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. रस्त्यांवर, मुक्कामाच्या ठिकाणी, वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर आदी ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
या दौऱ्यात हिलरी क्लिंटन यांचे वेरूळ परिसरातील शहाजतपूर येथील ध्यान फार्म हाऊसवर आगमन होणार आहे. येथे एक पोलिस निरीक्षक, एक उपनिरीक्षक, २० पोलिस कर्मचारी, ५ महिला पोलिस, कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात राहणार आहेत. लेणी आणि मंदिर परिसरात सुमारे १५० अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सोमवारी दुपारपासून या फार्म हाऊसच्या परिसरात पोलिस बंदोबस्त कडेकोट करण्यात आला आहे. येथून जाणाऱ्यांची झडती घेऊन चौकशी करून त्यांना जाण्यास मज्जाव केला जात आहे. हिलरी क्लिंटन यांच्याभोवती झेड प्लस सुरक्षेचा घेरा असेल. हिलरी क्लिंटन यांच्या सुरक्षेबाबत प्रत्येक अधिकारी आणि जवान पूर्णपणे सतर्क आणि दक्ष आहे. त्यांची काळजी घेण्यात आणि त्यांच्या सुरक्षेमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड