दिवाळीपूर्वी शेतकरी व ग्रामस्थांना नुकसानीची आर्थिक मदत मिळावी – हर्षवर्धन पाटील

14

इंदापूर, ९ नोव्हेंबर २०२०: नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या संपुर्ण क्षेत्राचे पंचनामे करण्यात यावेत व दिवाळीपूर्वी शेतकरी व घरांचे नुकसान झालेल्या ग्रामस्थांना शासनाकडून नुकसानीची आर्थिक मदत मिळावी तसेच अतिवृष्टीमुळे शेतमजूरांच्या हाताला काम नसल्याने त्यांना मोफत धान्य वाटप करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा भाजपच्या वतीने पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचेकडे करण्यात आली आहे ,अशी माहिती भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज सोमवारी (दि.9) दिली.

राज्यात अतिवृष्टीने सर्वात जास्त नुकसान पुणे जिल्ह्यात झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांची शनिवारी सायंकाळी भेट घेतली व चर्चा केली. यावेळी गावोगावच्या शेतमजुरांच्या हाताला काम उपलब्ध करुन देण्यात यावे, परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या कामगारांची योग्य ती नोंद जिल्हाधिकारी व अप्पर कामगार आयुक्तांकडे ठेवण्यात यावी,या मागण्याही करण्यात आल्या. या सर्व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी खा. गिरीश बापट, माजी मंत्री संजय भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी आमदार बाबुराव पाचार्णे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंधर कामठे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, रविंद्र भेगडे, धर्मेंद्र खांडरे आदीसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व मागण्यांवर त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

जिल्हा पोलीस प्रमुखांशीही चर्चा

तसेच पुणे जिल्हा भाजपच्या या शिष्टमंडळाने नव्याने नियुक्त झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला व विविध विषयांवरती संवाद साधला. जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला पायबंद घालण्यात यावा, सर्व जनतेला समान न्याय मिळावा, राजकीय हस्तक्षेप होत आहे तो होऊ नये, पोलिसांना निर्भयपणे काम करता आले पाहिजे, अशा मागण्या यावेळी शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. देशमुख यांच्याकडे केल्याची माहिती भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी – निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा