पाण्यात बुडून चार मुलांचा मृत्यू… रांजणगाव (शेणपुंजी) येथील हृदय द्रावक घटना

छत्रपती संभाजीनगर, १२ जानेवारी २०२४ : पोहण्यास गेलेल्या १२ ते १४ वयोगटातील चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही हृदय द्रावक घटना वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) त पाझर तलावात घडली.

वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील दत्तनगर येथे राहणारे चार मुले गुरुवारी दुपारी रांजणगाव (शेणपुंजी) येथील पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते. मात्र बराच वेळ झाला तरी मुले घरी आली नसल्याने पालकाने परिसरात विचारपूस केली. ही सर्व मुले पाझर तलावाकडे गेली असल्याची माहिती पालकांना मिळाली. त्यांनी तिथे जाऊन पहिले असता तलावाच्या काठावर मुलांचे कपडे व मोबाईल दिसून आले. त्यामुळे मुले पाण्यात बुडाली असल्याचा त्यांना अंदाज आला व त्यांनी मदतीसाठी धाव घेतली.

येथील उद्योजक प्रभाकर महालकर, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, ग्रामपंचायत सदस्य दत्तू हिवाळे, जावेद शेख, साईनाथ जाधव व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची तसेच वाळूज अग्निशमन दलाचे पी के चौधरी, के टी सूर्यवंशी, एन एस कुमावत, पी के हजारे, एस बी महाले, वाय डी काळे, एस बी शेंडगे आदींनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने मुलांचा शोध घेतला आणि त्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून आणण्यास मदत केली.

मृत व्यक्तीमध्ये विश्वजीतकुमार सुखदेव उपाध्यय (१२), अबरार जावेद शेख (१२), अफरोज जावेद शेख (१४) या तिघांची ओळख पटली असून एका मुलाची ओळख पटलेली नाही. त्या मुलाचे अंदाजे वय १४ असल्याचे सांगितले जाते. धक्कादायक बाब म्हणजे यात दोन सख्खा भावांचा समावेश आहे. थोड्याच अवधीत ही घटना वाऱ्यासारखी पूर्ण परिसरात पसरली असून गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, पोलीस निरीक्षक गणेश ताठे, पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक डाके, पोलीस अंमलदार योगेश शेळके आदींनी घटनास्थळी धाव घेत पाण्यातून काढलेले सर्व मृतदेह रांजणगाव ग्रामपंचायतच्या रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालय घाटी येथे ररवाना करण्यात आले. दरम्यान घटनास्थळी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, तहसीलदार सतीश सोनी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : गजानन राऊत

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा