जळगाव, ६ जुलै २०२३: जळगाव जिल्ह्यातील सिंचन, बिगर-सिंचननाकरिता महत्त्वाच्या अशा भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणांचे चार दरवाजे अर्धा मीटरने आज सकाळी १० वाजता उघडण्यात आले आहे. त्यामुळे तापी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उन्हाळ्याच्या शेवटी धरणातील पाणीसाठा जेमतेम शिल्लक होता. तसेच पावसाला उशिरा सुरुवात झाल्याने मधल्या काळात धरणावर अवलंबून असलेल्या सर्व पाणीपुरवठा यंत्रणा विस्कळित झाल्याने, जलसंकटाचा सामना करावा लागतो की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु उशिरा का होईना मध्यप्रदेशात जोरदार पाऊस झाल्याने, तापी नदीला पूर आलाय व धरणात पाण्याची आवक वाढल्याने जलसाठा उपलब्ध झाला.
आता भुसावळ शहरासह तापी नदीवर अवलंबून असलेल्या गावातील पाणीटंचाईची समस्या सुटणार आहे. पाउस सुरुच असल्याने पाण्याची आवक वाढतेय, त्यामुळे हतनूर प्रशासने धरणाचे चार दरवाजे उघडले आहे. आता १३६.०० क्युसेक्स विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आलाय, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर