रायगड, २० जुलै २०२३ : रायगड जिल्ह्यात प्रचंड मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ६ पैकी तब्बल ४ नद्यांच्या पाणी पातळीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. विशेष म्हणजे पाऊस अजूनही धुवांधारपणे कोसळतोय. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. रायगड जिल्हा माहिती कार्यालयाकडून ट्विटरवर याबाबतची सविस्तर माहिती जारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा या नद्यांची धोक्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. याशिवाय पाऊस असाच पडत राहिला तर उल्हास नदीदेखील इशारा पातळी ओलांडू शकते.
राज्यात काल दिवसभरात प्रचंड पाऊस पडला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, जळगाव जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत काल रेल्वे सेवा देखील ठप्प झाली. राज्यात पावसाचा हा ओघ असाच सुरु राहिला तर पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. प्रशासनाकडून सर्व काळजी घेतली जात आहे. पावसाने आता काही काळ तरी उसंत घ्यावा, अशी प्रार्थना सर्वसामान्य नागरीक करत आहेत, जेणेकरुन पाणी काहीसे कमी होईल.
हवामान विभागाने पुढचे २४ तास हे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. हवामान खात्याने काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय, तर काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज असर्ट जारी केला आहे. हवामान विभागाकडून पालघर, रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी, ठाणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर