दुसऱ्या पत्नीचा व्हिसासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी नवाब मलिक यांच्या मुलासह चौदा जणांवर गुन्हा

10

मुंबई, १८ जानेवारी २०२३ : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक अद्याप तुरुंगातून बाहेर आलेले नसताना त्यांच्यासाठी आणखी एक मोठी चिंतेची बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांचा मुलगा फराज मलिक याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. फराज मलिकवर त्याची दुसरी पत्नी हमलीनचा व्हिसा बनविण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुंबईच्या कुर्ला पोलिसांनी नवाब मलिक यांचा मुलगा आणि सुनेसह १४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसने त्यांच्या तपासणीत फराज मलिक आणि त्यांची दुसरी पत्नी हमलीन यांनी सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले. याची पुष्टी झाल्यावर ‘एफआरआरओ’ने कुर्ला पोलिसांना तत्काळ याची माहिती दिली. यानंतर कुर्ला पोलिसांनी फराज मलिक आणि त्याची पत्नी हमलीन यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६५, ४६८ आणि ४७१ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मुंबईतील साखळी बॉंबस्फोटातील आरोपींसोबत दाऊद इब्राहिमचे नातेवाईक आणि जमिनीच्या व्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिकला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. दाऊदची बहीण हसिना पारकर हिच्या साथीदारांच्या मदतीने नवाब मलिकने कुर्ल्यातील जमीन कवडीमोल भावाने बळकावली. या जमिनीच्या मालकाला हसिना पारकर यांच्या टोळ्या आणि मुंबई बॉंबस्फोटातील आरोपींच्या नावावर मुख्त्यारपत्र मिळाले आणि त्यानंतर अवघ्या २० लाख रुपयांत कोट्यवधींची जमीन बळकावली गेली. यानंतर हसिना पारकरच्या खात्यात ५० लाख रुपये जमा करण्यात आले. या पैशातून नंतर टेरर फंडिंग करण्यात आले आणि मुंबईत पुन्हा हल्ले झाले, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नवाब मलिक सध्या तुरुंगात आहेत. काही दिवसांपूर्वी विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला होता.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड