दोन कोटीच्या कर्जाचे आमिष दाखवून बांधकाम व्यावसायिकाची साडेबारा लाखाची फसवणूक

पुरंदर २६ सप्टेंबर २०२० :पुरंदर तालुक्यातील सासवड येथे राहणाऱ्या एका बांधकाम व्यासायिकास दोन कोटींचे कर्ज देतो, असे म्हणत कर्ज मंजुरीसाठी तब्बल साडे बारा लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक संजय वाडेकर यांनी सासवड पोलिसात तक्रार दिली आहे. याबाबत सासवड पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सासवड येथे राहणारे बांधकाम व्यावसायिक संजय वाडेकर याने त्यांचा मित्र प्रेमकुमार आहिवळे याने व्यवसाय कसा सुरु आहे याबाबत चौकशी केली. लॉकडाऊन असल्याने तसेच मंदी असल्यामुळे व्यवसायात भांडवल कमी पडत असल्याचे वाडेकर यांनी त्याला सांगितले .यानंतर वाडेकर यांच्या ओम इंटरप्राईजेस आणि डेव्हलपर या व्यवसायाच्या ठिकाणी येऊन एका खाजगी फायनान्स देणाऱ्या व्यक्ती कडून दोन कोटी कर्ज मिळवून देतो असे सांगितले. लॉकडाऊन मुळे व्यवसाय ठप्प झाल्याने वाडेकर कर्ज घ्यायला तयार झाले. यानंतर १३ जुलै रोजी प्रेमकुमार आहिवळे हा त्यांचा मित्र दिपक फडके रा.कानगाव ता. दौंड,जी.पुणे यासह वाडेकर यांच्या कार्यालयात आला.

यावेळी त्याने माहिना १ टक्के दराने दोन कोटी रुपये कर्ज देतो अशी खात्री दिली. त्याच बरोबर आपले जुने व्यवहारिक संबंध आहेत हे दाखवण्यासाठी त्यांच्या खात्यावर सात लक्ष रुपये ट्रान्सफर करण्यासाठी सांगितले. हे सात लक्ष रुपये पुन्हा तुमच्या खात्यावर ट्रान्स्पर करतो अशी खात्री त्याने दिली. दोन कोटी कर्ज मिळत असल्याने त्यांनी दीपक कोंडीबा फडके यांच्या जिल्हा बँकेत असलेल्या खात्यावर सात लाख रुपये वर्ग केले.यानंतर फडके यांनी पंधरा दिवसात दोन कोटी तुमच्या खात्यावर वर्ग करतो असे सांगितले.

यानंतर वाडेकर यांनी पार्टनरशिप डीडचा करारनामा ही पाठवला. पण पंधरा दिवसानंतरही दोन कोटीचे कर्ज मिळाले नाही. यानंतर विचारणा केली असता फडके यांनी आणखी साडे पाच लाख रुपये पाठवण्यास सांगितले. वाडेकर यांनी साडे पाच लाख रुपये बँकेतून त्यांना पाठवले. यानंतरही वाडेकर यांना कर्ज न मिळाल्याने त्यांनी दिलेले पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र रक्कम देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. उलट रक्कम मागण्यासाठी घरी आलात किंवा फोन केलात तर मी आत्महत्या करेन अशा प्रकारे त्याने धमकी दिली असल्याबाबत वाडेकर यांनी सासवड पोलिसांकडे तक्रार दिली आहे. याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक डी.एस.हाके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रविंद्र काळभोर करीत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा