मुंबई : जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध देशभरातून होत आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी अनेक संघटना, विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यात मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे आंदोलनादरम्यान ‘फ्री काश्मीर’ हे पोस्टर झळकवण्यात आले. हे पोस्टर झळकवणाऱ्या महक मिर्झा प्रभू या तरुणीवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच सुवर्णा साळवे, फिरोझ मिठीबोरवाला, जेएनयूचा माजी विद्यार्थी आणि कार्यकर्ता उमर खालिद यांच्यासह ३१ आंदोलकांवर कुलाबा पोलीस ठाण्यात एफआरआय दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात विद्यार्थी आणि अनेक युवक – युवती गेटवे ऑफ इंडिया येथे निदर्शने करत होती.
यापैकी ३१ जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे हुतात्मा चौकात आंदोलन करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांवर देखील एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महक मिर्झा प्रभू हिने फ्री काश्मीर असे लिहलेले पोस्टर झळकावल्या प्रकरणी भादंवि १५३ ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण दोन एफआयआर कुलाबा पोलीस ठाण्यात तर दोन माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.