जेजुरी, दि. २२ जुलै २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली चार महिने जेजुरीतील खंडोबा मंदिर बंद असून देवावर अवलंबून असणाऱ्या सर्व सामान्यांचे हाल होत आहेत. अनेक जेष्ठ नागरिकांकडे औषधे घेण्यासाठी पैसे नाहीत, अशा मधुमेही व उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना गेली सलग चार महिने मोफत औषधे जेजुरी आरोग्य सेवा संघाच्या वतीने देण्यात येत आहे. सध्या जेजुरी कंटेन्मेंट क्षेत्र असून या रुग्णांना घरपोच मोफत औषधें देण्यात आले असल्याचे डॉ नितीन केंजळें यांनी सांगितले.
दि १७ मार्च पासून महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाचे मंदिर लॉकडाऊन मूळे बंद करण्यात आले. देवावर विसंबून असणाऱ्या कुटुंबियांची अर्थव्यवस्था ढासळली. विशेषतः जेष्ठ नागरिक, मधुमेही, उच्चरक्तदाब, हृदयविकार आदी रुग्णांना नियमित औषधे विकत घेणेही अशक्य झाले. डॉ नितीन केंजळें, डॉ शमा केंजळें सामाजिक कार्यकर्ते प्रकाश खाडे यांच्या पुढाकारातून जेजुरी आरोग्य सेवा संघ सुरु करून गरजू रुग्णांची निवड करण्यात आली .सलग तीन महिने १०५ गरजू व्यक्तीना दरमहा ४८ हजार रुपयांची औषधे छत्री मंदिर परिसरात सामाजिक अंतर ठेवून वाटण्यात आली.
जेजुरी शहरात कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत असल्याने जेजुरी शहर कन्टेन्टमेन्ट क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. सलग चौथ्या महिन्यात गरजू रुग्णांना नियमित औषधे देण्यासाठी आरोग्य सेवा संघाने घरपोच औषधे सेवा सुरू केली. जेजुरी पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, डॉ नितीन केंजळें, प्रकाश खाडे, पुष्कर खाडे मंदार खाडे आदींनी ही घरपोच सेवा दिली आहे. सलग चार महिने गरजू रुग्णांना नियमित औषधे मिळत आहेत. अनेक रुग्णांनी जेजुरी आरोग्य सेवा संघाचे डॉ नितीन केंजळें, डॉ शमा केंजळें, प्रकाश खाडे व जेजुरी पोलीस स्टेशनचे एपीआय अंकुश माने यांचे आभार मानले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे