नाशिक शहरात मोरांचा मुक्त संचार

नाशिक, दि.२८ एप्रिल २०२० : नाशिकच्या मेरी कार्यालयात मोरांचा सध्या मुक्त संचार पाहायला मिळतो आहे. पूर्वीपासून हा भाग जंगलाचा असल्याने इथं शेकडो मोरांचा वावर होत असे. मात्र कालांतराने आजूबाजूला लोकवस्ती वाढली. जंगलतोड सुरू झाली परिणामी मोरांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होऊ लागली. तर काही मोरांची कत्तल देखील वाढू लागली. बघता बघता हे मोर दिसेनासे झाले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, संचारबंदीच्या काळात रस्ते निर्मनुष्य झाले. त्यातच एरवी आजूबाजूच्या परिसरात या मोरांना त्रास देणारे माणसं दिसेनाशी झाल्याने हे मोर आता पुन्हा मेरीच्या जंगलात मुक्तपणे पिसारा फुलवून संचार करतानाचे चित्र दिसू लागले आहे.

सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने हे मोर भल्या सकाळी आपला मंजुळ आवाज काढत धान्य टिपण्यासाठी झाडावरून खाली येतात. तर जून महिन्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला पहिल्या सरी अंगावर घेण्यासाठी पिसारा फुलवून नाचत असतात.

संचारबंदी काळात मेरीचे अधिकारी आणि कर्मचारी हे या मोरांसाठी धान्य पाण्याची व्यवस्था करत आहेत. मात्र पुरेसे धान्य नसल्याने अनेक स्वयंसेवी संस्थांना पुढे येण्याचं आवाहन केलं जात आहे.

एकुणच लॉकडाऊनच्या निमित्ताने का होईना मेरीच्या जंगलात मुक्त संचार करण्यासाठी मोरांना मोकळीक मिळाली आहे. मात्र लॉकडाऊन उघडल्यावर प्राणी आणि पक्षी मित्रांनी या वन्य जीवांची काळजी घेण्याची गरज आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा