पुणे, १७ डिसेंबर २०२२ : चाकण ग्रामीण रुग्णालयाची ३० खाटांवरून १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवाढ करण्यात आली आहे. १६ ऑगस्टला संबंधित खात्याचे आरोग्यमंत्री व अधिकारी यांना पत्रव्यवहार करून चाकण ग्रामीण रुग्णालय येथील ३० खाटांवरून १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवाढ करण्याचे काम मंजूर करण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावावर सही करून ते काम मंजूर केले; मात्र हे काम माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी मंजूर केल्याचे ते सांगत आहेत. वास्तविक हे खोटे व दिशाभूल करणारे असल्याचे दिलीप मोहिते-पाटील यांनी सांगितले आहे.
दिलीप मोहिते-पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले, की चाकण ग्रामीण रुग्णालयाची ३० खाटांवरून १०० खाटांपर्यंत मर्यादा वाढवून उपजिल्हा रुग्णालयाला श्रेणीवाढ मंजुरी देण्याकामी मी व विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. समोरासमोर बसून हा मुद्दा कागदोपत्री सिद्ध करावा, असे जाहीर आवाहनही त्यांनी आढळराव यांना केले आहे. या कामासाठी मी २०२० पासून सातत्याने पाठपुरावा करतो आहे. तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे व उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार; तसेच संबंधित अधिकारी यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार व प्रस्ताव सादर केले गेले. अंतिम सहीसाठी मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे हा प्रस्ताव प्रलंबित असतानाच, आमचे सरकार गेले आणि तो विषय प्रलंबितच राहिला. कागदपत्रांसहित याचा पुरावा माझ्याकडे आहे. त्यामुळे आढळराव यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा जनतेसमोर आला आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून यापुढेही चाकण शहरातील व त्या भागातील नागरिकांना उत्तम दर्जेदार आरोग्य सोयीसुविधा देण्याचे काम करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
चाकण ग्रामीण रुग्णालय येथील ३० खाटांवरून शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवाढ करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सही करून मंजुरी दिल्यानंतर, श्री. आढळराव यांची ‘उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग’ अशी अवस्था झाल्याने लगेच कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांची खासदारकीची १५ वर्षे निष्क्रियतेची गेली. माझ्या खेड तालुक्यात एकही चांगलं काम त्यांनी दिलेलं नाही; परंतु आम्ही मंजूर केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करीत आहेत. या कामाचा केलेला पत्रव्यवहार दाखवा आणि मग श्रेय घ्या, असे म्हणत आमदार मोहिते-पाटील यांनी त्यांना जाहीर आव्हान दिले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे