१४ ऑक्टोबरपासून दिवसात ३० टीएमसी पाणी भीमा नदीद्वारे गेले

5

माढा, १८ ऑक्टोबर २०२०: परतीच्या पावसाने संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला जोरदार तडाखा बसला असून उजनी जलाशयावर देखील बुधवार व गुरुवार या दोन दिवसात १४० मि.मी. पाऊसाची नोंद झाली आहे. जोरदार पाऊस पडल्याने अचानक आलेल्या पुरामुळे सोलापूर पुणे एम. एच. ६५ हायवे सुद्धा काही काळ भिगवण जवळ उजनीच्या पाण्याखाली गेला होता.

याच कालावधीत बुधवारी सकाळी ६ वाजता सहा हजार ६०० क्यूसेकने चालू असलेला विसर्ग दुपारी दोन वाजल्यापासून टप्प्याटप्प्यांनी उजनीतून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे उजनीकडे लक्ष लागून राहिले होते. निसर्गापुढे मानव हतबल असतो, तेच घडले. शेवटी धरणात आलेल्या प्रचंड पाण्याने २० हजार क्युसेक्सपासून सुरु करण्यात आलेला विसर्ग दहा तासात २५०००० क्यूसेक्स पर्यंत गेला. या तीन दिवसात उजनी तून ३० टीएमसी पाणी भीमा नदीला सोडण्यात आले, तर एकूण चालू हंगामात उजनी धरणातून भीमा नदीद्वारे ६० टीएमसी पाणी सोडण्यात आले.

उजनी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ५९.६२ टीएमसी असून तेवढाच टीएमसी पाणी उजनीतून जवळपास एकूण उपयुक्त टीएमसी एवढा पाणीसाठा उजनीतून चालू हंगामात गेला आहे. तर भीमा आणि नीरा या दोन नद्यांचा संगम म्हणजे नरसिंहपुर येथे गुरुवारी १५ ऑक्टोबर या दिवशी तीन लाख १२ हजार पाचशे विसर्ग येत होता. यामुळे भीमा नदीला आलेल्या प्रचंड महापुरामुळे पंढरपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात महापुराचा तडाखा बसला.

उजनी व्यवस्थापन विभागाचे कौतुक:

उजनी धरण २७ सप्टेंबरला उजनीचा ४० वर्धापन दिन साजरा झाला. या ४० वर्षात ऐवढे मोठे संकट उजनी धरणावर कधीही आले नव्हते. कारण उजनीच्या इतिहासात धरणाचे पाणी हायवेवरती येवून हायवे बंद पडला. ऐवढी मोठी जबाबदारी उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, सीओ धीरजकुमार साळे, उप अभियंता पाटील साहेब व कनिष्ठ अभियंता प्रशांत माने यांनी ही परिस्थिती उत्तम रित्या हाताळली याबद्दल संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून व मंत्रालयापासून या अधिकारी वर्गाचे कौतुक व अभिनंदन व्यक्त केले जात आहे.

उजनीची सद्यस्थिती:

एकूण पाणी पातळी ४९७.२५० मीटर

एकूण पाणी साठा ३४६३.३६ दलघमी
(टीएमसी १२२.४०)

उपयुक्त पाणी साठा १६६०.५५ दलघमी
(टीएमसी ५८.७०)

टक्केवारी १०९.४५ %

उजनीत येणारा विसर्ग:
दौंडमधून १७५००
बंडगार्डन ७८२१

उजनीतून सोडलेला विसर्ग:

कालवा बंद
नदी ४००००
वीजनिर्मिती १६००

न्यूज अनुकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा