मुंबई, १ नोव्हेंबर २०२०: भाज्यांचे भाव गगनाला जरी भिडले असले तरीही आता फळांचे भाव उतरले आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. अतिवृष्टीमुळं अनेक फळांचं व भाज्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. अनेक फळबागांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. त्यामुळं फळांच्या किमती देखील वाढ झाली होती. मात्र, आता फळांची आवक वाढल्यामुळं किंमतींमध्येही घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये आज एकूण ३५० गाड्यांची आवक झाली आहे. मुंबई एपीएमसीमध्ये फळांची आवक वाढल्यानं सफरचंद आणि सीताफळांच्या किंमती घसरल्या आहेत.
सीताफळाची आवक एक हजार क्विंटल झाली असून सीताफळ १० ते ३० रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. तर फळ बाजारात सफरचंदाची ११ हजार क्विंटल आवक झाली असून सफरचंदाच्या किंमतीत घसरण झाली आहे. १५० रुपये किलो दरानं विकला जाणारा सफरचंद सध्या बाजारात ६० ते ७० रुपये दरानं विकला जात आहे. हिमाचल, काश्मीर, शिमला, कुनुर या ठिकाणांहून सफरचंदाची मोठी आवक फळ मार्केटमध्ये झाल्यानं सफरचंदाचे भाव घसरले आहेत. मात्र, किरकोळ बाजारामध्ये कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नसल्यानं फळांचे भाव वाढून ते विकले जात आहेत. त्यामुळं दरवाढीचा सामना सर्वसामान्यांना करावा लागणार आहे.
तसंच डाळिंबाची आवक १०८० क्विंटल झाली असून ३५ रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. तर मार्केटमध्ये २१०० संत्रींची आवक झाली आहे. त्यामुळं संत्र्यांच्या भावातही घसरण झाली असून ३० रुपये प्रतिकिलोनं बाजारात विकली जात आहे. सोलापूर, अकोला, नगर, शिरूर या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात सीताफळाची आवक झाली आहे. तसंच सध्या फळ बाजारात हनुमान, गोल्डन, सुपर गोल्डन, काटेरी बाळापुरी, महानगरी अशा वेगेळ्यावेगळ्या प्रकारच्या सीताफळाची विक्री केली जात आहे. मात्र, एपीएमसी फळ मार्केटमध्ये सीताफळामध्ये किडे असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गोल्डन सीताफळ या प्रकारच्या सीताफळामध्ये किडे असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळं सीताफळाचे दर हे घसरले असून सध्या मार्केटमध्ये सीताफळ हे १० ते ३० रुपये प्रतिकिलोने विकले जात आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे