फुरसुंगीत कालवा फुटला; नवीन मुळा-मुठा कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया

पुणे, २७ डिसेंबर २०२२ : फुरसुंगी येथील देशमुख मळा येथे नवीन मुठा कालव्यात राडारोडा टाकल्यामुळे कालव्यातील पाणी पुढे सरकण्यास जागा न मिळाल्याने कालव्यास मोठ्या प्रमाणावर गळती लागली. परिणामी, लाखो लिटर पाणी वाया गेले. ही घटना सोमवारी (ता. २६) पहाटे पाच वाजता घडली. दरम्यान, या भागातील नागरिकांना ही घटना घडल्याची माहिती सकाळी समजल्यानंतर संबंधित उपअभियंता यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविले.

मात्र, हा उपअभियंता बाहेरगावी असल्यामुळे खडकवासला प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनाच पळापळ करून गळती रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला. सायंकाळी उशिरा कालव्यातून गळती होत असलेले पाणी थांबविण्यात यश आले. खडकवासला प्रकल्पातून दौंड, इंदापूर या भागांतील शेतकऱ्यांना नुकतेच रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे.

सध्या या कालव्यातून एक हजार क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, किलोमीटर २९ (फुरसुंगी-देशमुख मळा) येथे राडारोडा मोठ्या प्रमाणावर कालव्यात टाकण्यात आला आहे; तसेच झाडांच्या मुळ्या वाढल्या आहेत. या कालव्यातील राडारोडा आणि झाडांच्या मुळांची कोणतीही साफसफाई केलेली नाही. त्यातच अचानक वाढलेल्या पाण्यामुळे या भागातील कालव्यातील पाण्यास मोठ्या प्रमाणावर सोमवारी पहाटे गळती लागली.

याबाबत नागरिकांना समजल्यानंतर त्यांनी या कालव्याचे उपअभियंता मोहन भदाणे यांना मोबाईलवरून माहिती दिली. मात्र, त्यांनी गावी असल्याचे कारण दिले. परिणामी, खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांना माहिती देण्यात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाणी गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, सायंकाळी उशिरा गळती रोखण्यात यश आले. याबाबत पाटील म्हणाले, ’कालव्यातील गळतीची माहिती मिळताच गळती होत असलेल्या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने भराव टाकण्यात आला. त्यामुळे गळती रोखता आली.’

पाहणी न करताच सोडले पाणी
अधिवेशन काळात व कालव्याचे महत्त्वाचे आवर्तन सुरू असताना अधिकारी व कर्मचारी यांनी विनापरवानगी मुख्यालय सोडणे अपेक्षित नाही; तसेच कालव्यामध्ये बर्‍याच प्रमाणात कचरा साठला असून, पाहणी न करताच पाणी सोडण्यात आले होते, असे शेतकरीवर्गाचे म्हणणे आहे.

खडकवासला, पानशेत, वरसगाव धरण व पुण्यातील अत्यंत संवेदनशील असलेल्या मुठा कालव्याचे उपअभियंता मोहन भदाणे हे वारंवार आपल्या गावी जात असतात. आता हिवाळी अधिवेशन सुरू असतानादेखील विनापरवानगी मुख्यालय सोडणे नियमात बसत नसतानाही भदाणे गावी गेले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा