‘अक्षरबंध साहित्य पुरस्कारां’चे दिमाखदार सोहळ्यात वितरण
नाशिक, २७ डिसेंबर २०२२ ः उत्कृष्ट साहित्यकृतींना ‘अक्षरबंध’ने राज्यस्तरीय पुरस्काराच्या स्वरूपाने दिलेली कौतुकाची थाप साहित्यिकांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि अशा उत्कृष्ट दर्जाच्या पुरस्कारांमुळे महाराष्ट्राचे साहित्यिक वातावरण येत्या काळात निश्चितच बदललेले असेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी व गीतकार प्रकाश होळकर यांनी केले.
‘अक्षरबंध प्रतिष्ठान’तर्फे आयोजित राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे दहावा मैल ओझर येथे प्रकाश होळकर यांच्या हस्ते मोठ्या दिमाखदार सोहळ्यात वितरण झाले. वृक्ष व ग्रंथपूजनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. अवनी जोंधळी हिने गीताद्वारे कुसुमाग्रजांना आदरांजली वाहिली. ‘अक्षरबंध प्रतिष्ठान’चे अध्यक्ष प्रवीण जोंधळे यांनी पुरस्काराचे महत्त्व विशद केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक ऐश्वर्य पाटेकर, विजयकुमार मिठे, विवेक उगलमुगले, प्रा. यशवंत पाटील, किरण भावसार, हेमंत राजाराम, अर्चना देशपांडे, राजू देसले, प्रशांत भरवीरकर, प्रा. डॉ. प्रकाश शेवाळे आणि प्रा. विद्या सुर्वे-बोरसे उपस्थित होते. सर्वांनी मनोगत व्यक्त केले.
या साहित्य पुरस्कारांमध्ये औरंगाबाद येथील ज्योती सोनवणे यांच्या ‘दमकोंडी’ कथासंग्रहाला, पिंपळगाव येथील लक्ष्मण महाडिक यांच्या ‘स्त्री कुसाच कविता’ काव्यसंग्रहाला, औरंगाबाद येथील रमेश रावळकर यांच्या ‘टिश्यू पेपर’ कादंबरीला, मुंबई येथील डॉ. स्मिता दातार यांच्या ‘प्रभु अजि गमला’ या चरित्र लेखनाला, मुंबई येथील वीणा रारावीकर यांच्या ‘आकाशवीणा’ या ललित वाड्मयाला, नाशिक येथील राजेंद्र उगले यांच्या ‘थांब ना रे ढगोबा’ या बालसंग्रहाला, पुणे येथील प्रसाद ढापरे यांच्या ‘इकिगाई’ या अनुवादित पुस्तकाला आणि अमरावती येथील डॉ. राजेंद्र राऊत यांच्या ‘लीळाचरित्रातील कथनरूपे’ या समीक्षापर ग्रंथाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार देण्यात आले. पुरस्कारार्थींच्या साहित्यिकृतींचे स्वागत पालखीतून करण्यात आले; तसेच सटाणा येथील ज्येष्ठ साहित्यिक शंकर कापडणीस यांना ‘अक्षरबंध जीवनगौरव पुरस्काराने’, तर पुसद, यवतमाळ येथील निशा डांगे-नायगावकर यांना ‘अक्षरबंध साहित्यरत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ‘अक्षरबंध’तर्फे झालेल्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरणही मान्यवरांच्या हस्ते झाले. हे पुरस्कार पुरस्कृत करणारे भगवंत ढोकणे, दत्तात्रेय चौधरी, शीतल वारुळे, योगेश विधाते, आबा शिंदे, सरोजिनी देवरे, ललिता बोंबले, नलिनी पगार यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाला माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, भास्कर ठोके, देवीदास चौधरी, सुरेश पवार, रवींद्र कांगणे, विलास गोडसे, अमोल दरेक, संजय गोरडे, पुंजाजी मालुंजकर, विठ्ठलतात्या संधाण, विजय राहणे, सुरेखा बोऱ्हाडे, तुकाराम ढिकले, किरण सोनार, किरण पिंगळे, विलास पोतदार यांच्यासह अनेक साहित्यिक; विविध क्षेत्रांतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सप्तर्षी माळी, प्रा. डॉ. नीलेश घुगे, सुवर्णा घुगे, प्रीती जोंधळे, चारुशीला माळी, दीपाली मोगल, सचिन नवगिरे, आकाश बर्वे, अनुष्का माळी, अथर्व जोंधळे, गीतांजली माळी, गायत्री बर्वे आदींनी पुढाकार घेतला. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. डॉ. गणेश मोगल यांनी आभार मानले.
पुस्तक व ऑक्सिजन प्लँट भेट देऊन सन्मान
नेहमीच्या शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ सन्मान पद्धतीला फाटा देत या सोहळ्यात वाचन संस्कृती व वृक्षसंवर्धनालाही महत्त्व देऊन, प्रत्येक सन्मान पुस्तक व ऑक्सिजन प्लँट भेट देऊन करण्यात आला.
पुस्तकांची आई
भुकेसाठी भाकर जितकी महत्त्वाची आहे, तितकंच वाचनही महत्त्वाचं आहे. या दोन्ही गोष्टी ज्या माऊलीने जाणल्या, ती म्हणजे भीमाबाई. तिनं तिच्या हॉटेलमध्ये दोन्ही गोष्टी उपलब्ध करून दिल्या. जेवणाच्या टेबलवर जसा तिच्या भाकरीच्या खरपूस वास पोचतो, तसाच पुस्तकांचा वास भाकर खाणाऱ्यांपर्यंत पोचतो. ती खऱ्या अर्थाने पुस्तकांची आई आहे.
- ऐश्वर्य पाटेकर, युवा अकादमी पुरस्कारप्राप्त कवी
कवितेची भिंत, पुस्तकाची प्रतिकृती खास आकर्षण
पुरस्कार सोहळ्यातील नावीन्यपूर्ण ‘कवितेची भिंत’ व पुस्तकाची प्रतिकृती सर्वांसाठी खास आकर्षण ठरली. या कवितेच्या भिंतीवर महाराष्ट्रातील दिग्गज कवींच्या कविता पोस्टर स्वरूपात लावल्या आहेत. तर पुस्तकाच्या प्रतिकृतीवर महाराष्ट्रातील गाजलेल्या पुस्तकांच्या मुखपृष्ठांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. या दोन्ही गोष्टींसोबत सेल्फी काढण्याचा मोह उपस्थितांना आवरला नाही.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील













































