नवी दिल्ली, दि. २० जुलै २०२०: देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असून आसाम राज्यात आलेल्या पुरानंतर राजधानी दिल्लीतही गेल्या काही दिवसात पावसाची संततधार सुरु आहे. या पावसामुळे दिल्लीच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरवात झाली. याच मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टीचे दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टिका केली.
दिल्लीच्या आझादपूर अंडरपास, साऊथ एव्हेन्यू रोड, प्रल्हादपूर अंडरपास, नवी दिल्ली रेल्वे स्टेशन यांसारख्या भागांमध्ये पाणी साचलंय. लंडन-पॅरिस सारख्या रस्त्यांसाठी दिल्ली सरकारने रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प राबवलाय असं ऐकलंय. याची जाहीरात कधी पहायला मिळेल मुख्यमंत्री साहेब? अशा शब्दांत गंभीरने मुख्यमंत्र्यावर घणघणाती टिका केली आहे.
जाहीरातींचा अपवाद वगळता दिल्ली सरकारच्या अंतर्गत अजून कोणकोणते विभाग येतात हे लोकांना सांगा. केंद्र आणि दिल्ली पालिकेला दोष देत ६ वर्ष उलटली आहेत. जेवढा पैसा हॅशटॅग आणि जाहिरातींवर खर्च केला जातोय, तोच पैसा दिल्लीसाठी खर्च केला असता तर दिल्लीकरांनी तुमचे आभार मानले असते, असंही गंभीरने म्हटलंय.
गंभीरने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यावर केलेल्या या तुफान फटकेबाजीला अजूनही सरकार कडून कोणताच प्रतिसाद आला नाही. ते पाहणं रंजक ठरेल. तर दिल्ली सरकारला सध्या कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश येत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी