टोळक्याने पोलिसांवर शस्त्राने केला हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना!

पुणे, ८ जुलै २०२३: महाराष्ट्रात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आलीय. पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. येथे ९ ते १० जणांच्या टोळक्याने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान घडले असुन या चकमकीत एक पोलीस जखमी झालाय. या खळबळजनक घटनेने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या अधिकाऱ्यांनी पहाटे १ वाजता कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. माळवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील म्हाडा वसाहत येथे पोलिसांची शोधमोहीम सुरू होती. दरम्यान, रोझरी शाळेजवळ आठ ते दहा जण संशयास्पद हालचाली करताना पोलिसांना दिसले.

त्यानंतर जे घडले ते धक्कादायक होते. मात्र, या लोकांना पकडण्यासाठी पोलीस त्यांच्या दिशेने जात असताना एका संशयित आरोपीने पोलिसांवर बंदूक दाखवली. दरम्यान, एका आरोपीने पोलिसांवर धारदार शस्त्र फेकले असून या घटनेत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. एवढेच नाही तर या आरोपींनी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला.

आता पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चार जिवंत काडतुसे, दोन लोखंडी चाकू, क्लीव्हर, स्क्रू ड्रायव्हर, हातोडा आणि एक बंदुक जप्त करण्यात आले आहे. हे सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा