सिद्धू मूसेवाला हत्येचा मास्टरमाइंड गँगस्टर गोल्डी ब्रारला कॅलिफोर्नियात अटक

कॅलिफोर्निया, २ डिसेंबर २०२२: गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्ये मागील सूत्रधार गोल्डी ब्रारला कॅलिफोर्नियामध्ये ताब्यात घेण्यात आलंय. भारताच्या गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांकडून ही माहिती मिळालीय. मात्र, कॅलिफोर्नियाच्या बाजूनं याबाबत भारत सरकारला कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

२९ मे रोजी सिद्धू मुसेवाला यांची हत्या झाली होती. त्यांच्यावर उघडपणे गोळ्या झाडण्यात आल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारला ठरवण्यात आलं होतं, त्यानं लॉरेन्स बिश्नोई सोबत मुसेवालांच्या हत्येचं संपूर्ण नियोजन केलं आणि नंतर आपल्या शूटर्सच्या माध्यमातून हत्या घडवून आणली. याप्रकरणी पोलिसांनी ३४ जणांना आरोपी बनवलंय.

गोल्डी ब्रारवर १६ हून अधिक केसेस

सतींदरजीत सिंग उर्फ ​​गोल्डी ब्रार हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा मानला जातो. गेल्या वर्षी पंजाबमधील फरीदकोट जिल्ह्यातील न्यायालयानं युवक काँग्रेसचे नेते गुरलाल सिंग पहेलवान यांच्या हत्येप्रकरणी गोल्डी ब्रारविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं. गोल्डी ब्रार १६ हून अधिक गुन्हेगारी गुन्ह्यांमध्ये वाँटेड आहे. तो भारतातून कॅनडाला पळून गेला.

जारी करण्यात आली रेड कॉर्नर नोटीस

नुकतीच इंटरपोलनं गोल्डी ब्रारविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. गोल्डी ब्रारनं कॅनडात बसून सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा कट केला होता. याप्रकरणी दिल्लीतील तिहार तुरुंगात बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचीही चौकशी सुरू आहे. गोल्डी ब्रार हा लॉरेन्स बिश्नोई याच्या जवळचा आहे. दोघेही कॉलेजपासून एकत्र आहेत. गोल्डी ब्रारवर खून, हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी कट आणि शस्त्रास्त्रांची तस्करी असे आरोप आहेत.

कोण आहे गोल्डी ब्रार?

पंजाबमधील श्री मुक्तसर साहिब येथे राहणारा सतविंदर सिंग उर्फ ​​गोल्डी ब्रार याचा जन्म १९९४ मध्ये झाला. २०१७ मध्ये तो स्टुडंट व्हिसावर कॅनडाला गेला होता. गोल्डीनं बीएची पदवी संपादन केलीय. पंजाब पोलिसांच्या डॉजियरमध्ये त्याची ५ वेगवेगळी छायाचित्रं आहेत, ती चित्रं पाहिल्यास तो परिस्थितीनुसार त्याचे स्वरूप बदलत असल्याचं दिसून येतं. गोल्डी हा A+ श्रेणीचा गुंड आहे आणि न्यायालयानं त्याला फरार गुन्हेगार घोषित केलंय.

गोल्डी ब्रारवर खून, हत्येचा प्रयत्न, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, पंजाबमध्ये गोल्डीविरुद्ध एकूण १६ गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये ४ मध्ये तो निर्दोष सुटलाय. कॅनडाला पळून जाण्यापूर्वी गोल्डीच्या गुन्हेगारी कारवाया पंजाबमधील फिरोजपूर आणि श्री मुक्तसर साहिबमध्ये शिगेला पोहोचल्या होत्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा