Gani Sayyad Silver Crown Offering at Vitthal Temple: गनी सय्यद गेल्या काही काळापासून पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या कामात सहभागी आहेत. मंदिराच्या दुरुस्तीसाठी लागणारे दगड फोडण्याचे काम ते करतात. या कामानिमित्त त्यांचा मंदिरात सातत्याने येण्याजाण्याचा संबध आला. याच दरम्यान, त्यांच्या मनात श्री विठ्ठलाबद्दल अपार भक्ती निर्माण झाली. मंदिरातील शांत आणि पवित्र वातावरणाने त्यांना विठ्ठलाच्या अधिक जवळ आणले. या भक्तीच्या भावनेतूनच त्यांनी आपल्या कष्टाने कमावलेल्या पैशातून एक किलो चांदीचा मुकुट बनवून तो विठ्ठलाच्या चरणी अर्पण करण्याचा निर्णय घेतला.
शुक्रवार, २७ जून २०२५ रोजी गनी सय्यद यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जाऊन आपल्या श्रद्धेने हा चांदीचा मुकुट विठ्ठलाच्या चरणी अर्पण केला. त्यांच्या या भक्तीने मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांच्यासह सर्वांना प्रभावित केले. गहिनीनाथ महाराजांनी गनी सय्यद यांचा सत्कार करून त्यांच्या भक्ती आणि निष्ठेचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, गनी यांचे हे कृत्य म्हणजे खऱ्या अर्थाने सामाजिक एकतेचे आणि समानतेचे प्रतीक आहे.
नुकतेच वारीदरम्यान मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांची सेवा केल्याच्या हृदयस्पर्शी घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्याच पंढरीच्या मातीतील गनी सय्यद यांच्या या कृतीने सामाजिक सलोख्याचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. गनी सय्यद यांच्या या भक्तीमय कृतीने सर्व धर्म समभाव या विचारला आणखी बळकटी मिळाली आहे.
सय्यद यांच्या या अनोख्या भक्तीची आणि सामाजिक एकतेची कहाणी सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली आहे. त्यांच्या या कृतीने सर्व धर्म आणि जातींच्या लोकांना एकत्र आणण्याचे काम केले आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात त्यांनी अर्पण केलेला चांदीचा मुकुट हा केवळ भक्तीचेच नव्हे, तर माणुसकी आणि एकतेचेही प्रतीक बनला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; जुई काळे
