गर्भवती हत्तीणीच्या मृत्यू प्रकरणी एकजण ताब्यात

नवी दिल्ली, दि.४ जून २०२०: केरळ राज्यात गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खाऊ घातल्याने तिचा अत्यंत दुर्देवी मृत्यू झाला आहे. अशी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या अत्यंत क्रुर घटनेचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावरही यावरुन बराच विरोध सुरू आहे. हत्तीणीच्या हत्येच्या आरोपींना अटक करून त्यांना लवकरात लवकर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

मात्र, आज गुरुवारी केरळ येथील मानकरगड वन पथकाने या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्या व्यक्तीची चौकशी सुरू आहे. या व्यक्तीबाबत अद्याप कुणाला माहिती देण्यात आलेली नाही.

याबाबत मुख्य वन्यजीव वॉर्डन यांनी सांगितले की, प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालानुसार फटाक्यांमुळे हत्तीणीच्या तोंडाला जखम झाल्याचे दिसून आले. हे कसले स्फोटक आहे, ते अननस, किंवा इतर कोणत्या फळांमध्ये लपेटून दिले गेले होते, ही संपूर्ण माहिती पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच समोर येईल.असेही त्यांनी सांगितले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी सांगितले की, केरळमधील मल्लापुरममध्ये हत्तीणीच्या हत्येबद्दल केंद्र सरकार गंभीर आहे. आम्ही योग्य चौकशी करुन दोषींना पकडण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. हत्तींणीला फटाके खाऊ घालून मारणे ही भारतीय संस्कृती नाही. ज्यांनी अननसात स्फोटके ठेवून हत्तीणीला खायला दिले होते. त्यांना पकडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे जावडेकर यांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा