अपघाताचा बनाव करून ३० लाखांचा लसूण परस्पर विकला, तिघांना बेड्या

नगर, १४ सप्टेंबर २०२३ : व्यापाऱ्याने मध्य प्रदेशातून २० हजार किलो लसूण खरेदी करून तो ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकमधून बंगळूरसाठी पाठवला, पण ट्रकचालकाने अपघाताचा बनाव करून साथीदारांच्या मदतीने सर्वच लसूण विकला. या बनवाबनवीच्या गुन्ह्याचा छडा स्थानिक गुन्हे शाखेने लावला असून, लसूण खरेदी करणाऱ्यासह विकणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

सन्वरलाल आंबालाल जाट, रविकांत काळुराम सेन राहणार राजस्थान अशी लसूण विकणाऱ्या दोघांची नावे आहेत. तर रामदास तुकाराम बोलकर राहणार श्रीरामपूर असे खरेदीदारांचे नाव आहे. नगरमधील साकत शिवारात ट्रकचा अपघात झाल्याचा बनाव करून चालकाने लसूण विकल्याचा गुन्हा व्यापारी समद सिद्दीकी तुंबी, राहणार गुजरात यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.

आरोपी सन्वरलाल आंबालाल जाट साथीदारांसह बाभळेश्वर- राहता येथे असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. खरेदी करणारा बोलकर यांच्या शेडमधून २७ लाख ३२ हजार ४०० रुपये किंमतीचा लसूण जप्त करण्यात आला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा