जोधपूरमध्ये लग्न समारंभात गॅस सिलिंडरचा स्फोट, ४ जणांचा मृत्यू

जोधपूर, ९ डिसेंबर २०२२ :राजस्थानच्या जोधपूरमध्ये एका लग्न समारंभात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात तब्बल ६३ पेक्षा अधिक जण होरपळले असून ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. शेरगडजवळील भुंगरा गावात गुरुवारी हा अपघात झाला. येथे एका घरी विवाह सोहळा होता. मिरवणूक घरातून निघणार होती, तेवढ्यात अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. दरम्यान, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता रुग्णालयात पोहोचले. डॉ. एसएन मेडिकल कॉलेजचे प्राचार्य दिलीप कछावा यांनी सांगितले की, ६० जखमींपैकी ५१ जणांना जोधपूरच्या महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी ८ जण ९० टक्क्यांहून अधिक भाजले आहेत. या अपघातात चार जणांनी आपला जीव गमावला आहे.

  • एकामागोमाग एक स्फोट

ज्या ठिकाणी ही घटना घडली, तेथे मोठ्या संख्येने वराती उपस्थित होते. आगीत जखमी झालेल्या लोकांना शेरगड येथे आणण्यात आले. तर काही लोकांना जोधपूर येथील महात्मा गांधी रुग्णालयाच्या बर्न युनिटमध्ये दाखल करण्यात आले आहे. ग्रामीण पोलीस अधिकारी अनिल कायल यांनी सांगितले की, तब्बल पाच सिलिंडरचा स्फोट झाला आहे. स्वयंपाक करत असताना अचानक सिलिंडर गळती होऊन ही आग लागली. आणि एकामागोमाग एक स्फोट होऊ लागले.

  • सिलिंडरचा स्फोट महिलांच्या अंगावर

मिळालेल्या माहितीनुसार, लग्न समारंभाच्या वेळी महिला हॉलमध्ये बसून बोलत होत्या. यावेळी सिलेंडरचा स्फोट झाला. जखमींमध्ये महिलांची संख्या अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच आरसीएचे अध्यक्ष वैभव गेहलोत, आमदार मनीषा पनवार, शेरगडच्या आमदार मीना कंवर हेही रुग्णालयात पोहोचले.

  • मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांकडून दु:ख व्यक्त

मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. दोघांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून अपघाताची संपूर्ण माहिती घेतली. उपचारात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये, अशा सूचना दिल्या.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा