गौतम पाषाणकर प्रकरणाचा लवकरच होणार उलगडा…

पुणे, ८ नोव्हेंबर २०२०: पुण्यातील वाहन उद्योग क्षेत्रातील पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम पाषाणकर हे बुधवारी (दि. २१) सायंकाळपासून बेपत्ता झाले होते. यासंदर्भात त्यांचे पुत्र कपिल पाषाणकर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. याच्या आठ दिवसानंतर त्यांच्या मुलानं यात राजकीय हस्तक्षेप असल्याचा गौप्यस्फोट देखील केला होता. यानंतर या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरूच आहे. मात्र, आता या प्रकरणाच्या तपासाला वेग येणार असल्याचं सांगितलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याप्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून गौतम पाषाणकर यांचा कसून शोध घेतला जात आहे. पाषणकरांच्या शोधासाठी पुणे पोलिसांचे पथक शहर आणि जिल्ह्याबाहेरही पाठवण्यात आले आहे. पाषाणकर यांना कोल्हापूरपर्यंत नेण्यात आल्याची बाब प्राथमिक तपासात निदर्शनास आली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यासंदर्भात माहिती दिली.

गौतम पाषाणकर हे ऑटोमोबाईल क्षेत्रातील मोठं नाव आहे. गेल्या २१ दिवसांपासून ते बेपत्ता आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातून गौतम पाषाणकर बेपत्ता झाले होते. पोलीस सध्या जागोजागी पाषाणकर यांचा शोध घेत असून त्यांचे नातेवाईक आणि कार चालकाची चौकशी करत आहेत. पाषाणकर कोणालाही दिल्यास त्यांच्या कुटुंबाला ९८२२४७४७४७ या मोबाईल क्रमांकावर किंवा शिवाजीनगर पोलिस ठाण्याला ०२०-२५५३६२६३ या क्रमांकावर कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा