बारामती, १२ ऑक्टोबर २०२०: बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांना बातमीदारकडून खात्रीलायक मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गणेश काशीद (रा. मेडद ता.बारामती जि पुणे) याच्याकडे देशी बनावटीचे गावठी पिस्टल आहे. अशी माहिती मिळाल्यावर गुन्हे शोध पथकाच्या सहा.पोलीस निरीक्षक लंगुटे व त्यांच्या पथकाने कारवाई करत शितापीने आरोपीला पकडण्यात यश आले आहे.
अवैध बंदुकीची माहिती पोलिसांना मिळाल्यावर सहा. पोलीस निरीक्षक लंगुटे व त्यांच्या पथकाने दोन दिवस, दिवस रात्र गणेश काशिद याच्यावर वेशांतर करून पाळत ठेवली होती. काशीद हा मेडद गावातील भैरवनाथ पेट्रोल पंपासमोर असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस पथक या ठिकाणी पोहचले. मात्र काशीद याला पोलीस आल्याची चाहूल लागताच तो तेथुन पळून जावू लागला. मात्र पोलीसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले व त्याची अंग झडती घेतली असता काशीद याच्या कंबरेला डाव्या बाजुस एक गावठी बनावटीचे पिस्टल अग्नीशस्त्र मिळून आले. या पिस्तुल व त्याच्या परवाना बाबतीत विचारपूस केली असता त्याच्याकडे पिस्टलचा कोणताही परवाना नसल्याचे काशीद याने सांगितले. त्याच्यावर बारामती तालुका पोलीस ठाणे ग.र.क ६२८/२०२० भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) सह २७ कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून काशीद यांस अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, सहा.पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, सहा.फौजदार दिलीप सोनवणे, पोलीस कॉन्टेबल नंद जाधव, विनोद लोखंडे, मंगेश कांबळे, प्रशात राउत, संतोष मखरे कारवाईमध्ये सहभागी होते.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव