भिगवण, पुणे १८ फेब्रुवारी २०२६ : भिगवण पोलिस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक अपहरणाची घटना घडली आहे. जहीर अरुण शेख आणि अयान हारून शेख या दोन आरोपींनी दुचाकीवरून जात असलेल्या आई, तिच्या मुली आणि मुलाच्या डोळ्यांत लाल चटणी टाकून गाडी अडवली आणि २१ वर्षीय तरुणीचे अपहरण केल्याची तक्रार दाखल झाली आहे.
घटना उघड होताच भिगवण पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून जिल्हाभर नाकाबंदी केली. विविध टोल नाके, प्रमुख रस्ते आणि प्रवेशद्वारांवर तपासणी सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. काही हिंदू संघटनांनी आक्रमक भूमिका घेत पुणे–सोलापूर महामार्ग अडवला. महामार्गावर टायर जाळण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आणि रस्ता मोकळा करण्यात आला.
सध्या पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून, संबंधित तरुणीचा सुरक्षित शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
न्युज अनकट प्रतिनीधी : दिनेश वढणे
