ठाणे, १७ जुलै २०२०: ठाण्यात यंदा बारावीचा निकाल ८९. ८६ टक्के इतका लागला असून दरवर्षीप्रमाणे यंदादेखील निकालात मुलींनी बाजी मारली.
सर्वच तालुक्यांतील मुलींचा निकाल नव्वदीपार गेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्याच्या निकालात या वर्षी तब्बल पाच टक्क्यानी वाढ झाली आहे. जिल्ह्यात मुरबाड तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९२. ८३ टक्के इतका लागला आहे.
मुंबई विभागीय मंडळामध्ये समाविष्ट असलेल्या ठाणे जिल्ह्याची या निकालावर चांगलीच छाप पडली आहे. जिल्ह्यातील ९१ हजार ३७७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ९१ हजार ३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८१ हजार ८०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मुलांची संख्या ४१ हजार ७७८ आणि मुलींची संख्या ४० हजार २७ आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण अनुक्रमे ८७. ०५ आणि ९२. ९९ टक्के इतके आहे.
उत्तीर्ण झालेल्या एकूणपैकी १० हजार ६४० विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी, २७ हजार ९८० विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, ३८ हजार ४०४ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी, तर ४७८१ विद्यार्थ्यांना पास श्रेणी मिळाली आहे.
ठाणे जिल्ह्यातून यंदा ९० हजार १६२ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ७९ हजार २२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.७ हजार ३३३ खाजगी विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेत पाच हजार १०६ उत्तीर्ण झाले. जिल्ह्याच्या एकूण निकालात चांगलीच वाढ झाल्याने शिक्षण क्षेत्रासह विद्यार्थांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे