मुंबई, १० फेब्रुवारी २०२३ : मुंबई विमानतळावरून सीमाशुल्क विभागाने कोट्यावधी रुपयांचे सोने आणि विदेशी चलन जप्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८ आणि ९ फेब्रुवारी २०२३ रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये सीमाशुल्क विभागाने एका व्यक्तीकडून सुमारे २.८ किलो सोने जप्त केले असून, ज्याची किंमत सुमारे १.४४ कोटी रुपये आहे.
तर सीमाशुल्क विभागाने एका प्रवाशाकडून सुमारे ९०,००० अरब अमिराती दिराम आणि ९०,००० अमेरिकन डॉलर्स जप्त केले आहे. जप्त केलेल्या विदेशी चलनाची किंमत अंदाजे ९२ लाख रुपये आहे. अमेरिकन डॉलर्सची तस्करी करणाऱ्या आरोपी प्रवाशाने हे डॉलर एका पॅकेटमध्ये ठेवले होते. तसेच दिरामची तस्करी करणाऱ्या व्यक्तीने एका बॉक्समध्ये दिराम ठेवले होते. कसून चौकशीनंतर आरोपी पकडला गेला.
कोची येथील एका प्रकरणात विमानतळावरूनही कस्टम विभागाने एका प्रवाशाकडून जवळपास ८०५. ८२ ग्रॅम सोने जप्त केले आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे ४० लाख रुपये असून आरोपी प्रवाशाने हे सोने आपल्या शरीरात कॅप्सूलच्या स्वरूपात लपवून ठेवले होते. रिशाद असे आरोपीचे नाव असून तो केरळमधील पलक्कडचा रहिवासी आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक