पुणे-दौंड प्रवाशांसाठी रेल्वेकडून लवकरच आनंदाची बातमी, पुणे लोणावळा लोकल सेवेत तीन दिवस बदल

पुणे २७ जून २०२३: पुणे ते लोणावळा आणि पुणे ते दौंड हा प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे लोणावळा लोकलने पुणे शहर आणि उपनगरातील अनेक जण प्रवास करत असतात. परंतु त्यांना आता काही दिवस गैरसोय सहन करावी लागणार आहे. त्याचवेळी दुसरीकडे पुणे- दौंड प्रवास करणाऱ्यांना चांगली बातमी मिळणार आहे. पुणे ते दौंड संदर्भात लोकल सुरु करण्याची अनेक वर्षांपासूनची असणारी मागणी आता पूर्ण होणार आहे. त्याद्दष्टिने महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोणावळा रेल्वे स्थानकावर काही तांत्रिक कामे करण्यात येणार आहे. यामुळे अनेक लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. २७ ते २९ जून दरम्यान पुणे ते लोणावळा लोकल बंद असणार आहे, अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली. या दरम्यान रद्द करण्यात आलेल्या लोकल पुढील प्रमाणे आहेत.

पुणे येथून सकाळी ९.५७ वाजता सुटणारी ०१५६२ ही लोकल गाडी रद्द केली आहे.तसेच पुणे येथून सकाळी ११.१७ वाजता सुटणारी लोकलही रद्द करण्यात आली आहे.त्याचबरोबर लोणावळा येथून पुण्याकडे दुपारी २.५० वाजता सुटणारी ०१५६४ गाडी रद्द केली आहे.तसेच लोणावळा येथून दुपारी २.५० वाजता सुटणारी ०५१६१ ही लोकल रद्द केली आहे.तर लोणावळा ते शिवाजीनगर पर्यंत असणारी ०१५६३ दुपारी ३.३९ ची गाडी रद्द केली आहे.

पुणे ते दौंड प्रवास करणाऱ्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे. पुणे ते दौंड दरम्यान लवकरच लोकल सेवा सुरु होणार आहे. त्यासाठी मुंबईवरुन पुणे विभागाला देण्यासाठी इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट म्हणजेच ईएमयूला मान्यता मिळाली आहे. त्याचा फायदा पुणे ते दौंड प्रवास करणाऱ्या ५० हजार लोकांना होणार आहे. यासाठी सहा महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. सध्या या मार्गावर डेमू धावत आहे. परंतु लोकल सुरु झाल्यास प्रवास अधिक चांगला होणार आहे.

सध्या पुणे ते लोणावळा दरम्यान लोकल धावत आहे. या लोकलसाठी सिमेन्स रेक वापरला आहे. सिमेन्स रेकचा वेग ताशी १०० किमी आहे. परंतु दौंडसाठी बम्बार्डियर रेक वापरला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या रेकचा वेग ११० किमी आहे. यामुळे लोणावळापेक्षा दौंडचा प्रवास वेगवान होणार आहे. पुणे ते दौंड दरम्यान पाच लोकल धावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा