मुंबई, ७ ऑगस्ट २०२० : राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग आणि गूगल यांच्यामार्फत राज्यातल्या शाळांसाठी गूगल क्लास रूम प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
जी स्वीट आणि गुगल क्लास रुमच्या माध्यमातून विद्यार्थ्याना सुविधा देणारं महाराष्ट्र हे देशातलं पाहिलं राज्य ठरल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो, असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातल्या सर्व अधिकार, कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. जी स्वीट फॉर एज्युकेशन, गूगल क्लास रूम, गूगल मीट यासारख्या विनामूल्य साधनांसह दूरस्थ शिक्षणाची सोय यामुळे होणार आहे.
गुगल बरोबरच्या या भागीदारीमुळे राज्यातले २ कोटी ३० लाख विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू शकणार आहेत. गुगलच्या सहकार्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यातील सर्व भागातील विद्यार्थ्यांची शिक्षण प्रक्रिया सुरुळित सुरु होण्यास मदत होईल, अस मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं.
या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनाही समान आणि दर्जेदार शिक्षण मिळण्याची सोय झाली आहे, असं सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकल्पाचं कौतुक केलं.
तर या प्रकल्पाच्या आधारे महाराष्ट्र शिक्षणात अग्रेसर राज्य बनवण्याचा विश्वास शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी