फादर्स डे निमित्त गुगलने बनवलं खास डूडल, जाणून घ्या कधी आणि कसा सुरू झाला हा दिवस

9

Father’s Day 2022, 19 जून 2022: जेव्हा मुलं हळूहळू मोठी होतात आणि त्यांना जबाबदाऱ्या समजू लागतात तेव्हा त्यांना कळतं की वडील म्हणजे काय आणि वडिलांची भूमिका काय असते. वडिलांच्या प्रेमाचा आणि त्यागाचा सन्मान करण्यासाठी जगातील सर्व देशांमध्ये फादर्स डे साजरा केला जातो. फादर्स डे दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी आपल्या वडिलांना आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. गतवर्षीप्रमाणंच, सर्च इंजिन गुगलने आज 19 जून 2022 रोजी फादर्स डे निमित्त खास डूडल बनवलंय.

फादर्स डे निमित्त गुगलच्या डूडलमध्ये एक छोटा आणि एक मोठा असे दोन हात दिसत आहेत. वडिलांना समर्पित फादर्स डेच्या डूडलमध्ये मुल वडिलांची प्रतिमा कशी बनते हे स्पष्टपणे दिसत आहे. फादर्स डे सेलिब्रेशन कधी आणि कसं सुरू झालं ते जाणून घेऊया.

फादर्स डे’चा इतिहास

1910 मध्ये फादर्स डे साजरा करण्यास सुरुवात झाली. वॉशिंग्टनच्या स्पोकेन शहरात राहणाऱ्या सोनोरा डोड या मुलीने फादर्स डेची सुरुवात केली होती, असं मानलं जातं. सोनोराच्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी तिला एकट्यानं वाढवलं. वडिलांनी मुलीला आईसारखं प्रेम दिलं आणि वडिलांप्रमाणं तिचं रक्षण केलं. सोनोराचे वडील तिला आईची उणीव कधीच जाणवू देत नसत. आईच्या मातृत्वाला वाहिलेला मदर्स डे जसा साजरा करता येतो, तसा वडिलांच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा गौरव करून फादर्स डेही साजरा करायला हवा, असा विचार सोनोरा यांनी केला.

कधी सुरू झाला ?

सोनोराच्या वडिलांचा जून महिन्यात वाढदिवस होता. त्यामुळंच त्यांनी जूनमध्ये फादर्स डे साजरा करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. जे मान्य करण्यात आलं आणि 19 जून 1910 रोजी पहिल्यांदा फादर्स डे साजरा करण्यात आला. यानंतर 1916 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनीही फादर्स डे साजरा करण्याचा प्रस्ताव मान्य केला. 1924 मध्ये राष्ट्राध्यक्ष केल्विन कूलिज यांनी फादर्स डे हा राष्ट्रीय कार्यक्रम घोषित केला. नंतर 1966 मध्ये, राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करण्याची घोषणा केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा