नाशिक मधील अंबड परिसरात गुंडांनी दुचाकी जाळली, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक, दिनांक २३ सप्टेंबर २०२२ : नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. आता पोलीस नेमकं काय करत आहेत असा संतप्त सवाल नाशिकच्या अंबड परिसरातील रहिवाशांनी उपस्थित केला आहे. मागील आठवड्यात येथील रहिवाशांच्या घरावर दगडफेक करून हातात धारधार शस्र घेऊन दहशत माजवण्याचा प्रकार घडला होता. यातील आरोपी अद्याप पोलीसांना मिळाले नाहीत. आता याच अंबड परिसरात दुचाकी जाळून गुंडांनी दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पोलीसांकडून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. याबाबत नागरिकांकडून अंबड पोलीस ठाण्यात तक्रारी करण्यात आल्या असून पोलीस कोणता पावित्र घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी अंबड परिसरातील दत्तनगर भागामध्ये सुमारे १५ ते २० गुंडांनी येथील नागरिकांच्या घरावर दगडफेक करून हातात धारधार हत्यार घेऊन दहशत माजवली होती. ही घटना ताजी असतानाच दत्तनगर परिसरातील संदीप नाठे यांच्या घराबाहेर उभी असलेली दुचाकी जाळल्याची घटना घडली आहे.

दत्तनगर येथील संदीप नाठे यांच्या घरासमोर दुचाकी एम एच १५ जीवाय ९८३८ या गाडीवर पेट्रोल टाकून जाळले. दुचाकीने पेट घेतल्यावर अचानक टायर फुटल्याचा आवाज आला त्यामुळे नाठे हे घरा बाहेर आले. मोठा आवाज झाल्याने इतर नागरिक ही त्या ठिकाणी जमा झाले. जमलेल्या नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले परंतु तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाली होती.

स्थानिक नागरिकांकडून सदर घटनेची माहिती अंबड पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित आरोपींचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाई मध्ये काय होते याकडे स्थानिक नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा