१७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्यासंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जारी

मुंबई, ११ ऑगस्ट २०२१: नुकतेच राज्य सरकारने निर्बंध हळूहळू कमी करण्यास सुरुवात केली आहे. खास करून पुण्यासारख्या शहरात देखील ९ ऑगस्ट पासून सर्व दुकान खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र अद्याप शाळा सुरू करण्यात आलेल्या नाही. काही दिवसांपूर्वीच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी लवकरच शाळा सुरू करण्याबाबत संकेत दिले होते. आता असा निर्णय देखील शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आला आहे. १७ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्यासंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की, शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र सरसकट आम्ही शाळा सुरू करत नाहीत. ज्या ठिकाणी सुरक्षा आहे त्याच ठिकाणी शाळा सुरू करत आहोत. शिक्षकांचं लसीकरण केलं जाणार आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन निर्णय घेतील. टास्क फोर्सने जे संगितलं आहे ते समोर ठेऊन हा निर्णय घेत आहोत.

राज्य सरकारने अनेक जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केले आहेत. राज्यातील कोरोना संसर्ग कमी झालेल्या भागातील निर्बंध शिथील केल्यानंतर सरकारचा हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. राज्यातील ग्रामीण भागात दि .१७ ऑगस्ट २०२१ पासून इयत्ता ५ वी ते ७ वी चे वर्ग आणि शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यास शासनानं परवानगी दिली आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आले आहेत.

कोरोना संसर्ग जादा असलेल्या जिल्ह्यांच्या निर्णयाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या जिल्ह्यात कोविड परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

दिनांक १७ ऑगस्ट,२०२१ पासून राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते ७ वी चे वर्ग व शहरी भागातील इयत्ता८ वी ते १२वी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेवून शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच दिनांक २ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या ब्रेक द चेन मधील सुधारीत मार्गदर्शक सूचनानुसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर जिल्ह्यातील कोविड परिस्थिती विचारात घेवून व अन्य जिल्ह्यांबाबत देखील शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

शाळा सुरु करण्यासाठी महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत स्तरावर समिती तयार करण्यात येतणार आहे. त्या समितीनं शाळा सुरु करताना दक्षता घ्यायची आहे.

शाळा सुरू करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना

• शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित कराव्यात.

• शाळा सुरू करत असताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळा भरवण्यात यावी.

• एका बाकावर एकच विद्यार्थी व दोन बाकामध्ये मध्ये सहा फुटाचे अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी असावे.

• कोरोना सदृश्य कोणतीही लक्षणे दिसल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे आणि त्याची योग्य ती चाचणी करावी, अस मार्गदर्शन सूचनामध्ये नमूद करण्यात आले आहे.

• हात धुण्याच्या सर्व ठिकाणी साबण, हॅन्ड वॉश आणि स्वच्छ पाण्याची व्यवस्था करणे.
जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रात भरवण्यात याव्यात.

• प्रत्यक्ष वर्गाचा कालावधी ३ ते ४ तासापेक्षा अधिक नसावा. प्रत्यक्ष वर्गाकरिता जेवणाची सुट्टी सुद्धा नसेल.

• शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक यांनी शाळेच्या परिसरात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील.

• सोबतच शाळेत येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्क्रीनिंग चाचणी घेण्यात यावी.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची सोय प्रशासनाकडून केली जावी.

• विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत्व पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल.

• शाळा सुरू करण्यापूर्वी त्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा