पुणे १३ जून २०२३: आज १३ जून रोजी, रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ७० हजार तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या. या निवडक तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या तरुणांना नियुक्ती पत्र दिले तसेच त्यांनी युवकांना संबोधितही केले.
आज मंगळवारी देशभरात ४३ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या विभागांमध्ये तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील रिक्त पदांवर नवीन भरती करण्यात आली. निवड झालेल्या उमेदवारांची विविध विभागांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या रोजगार मेळाव्याअंतर्गत नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.
पंतप्रधान कार्यालयाने (PMO) जारी केलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान मोदींनी आज १३ जून रोजी सकाळी १०.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुमारे ७०,००० नियुक्ती पत्रांचे वितरण केले. हा सहावा रोजगार मेळावा आहे. यापूर्वी १६ मे २०२३ रोजी पाचव्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारने ऑक्टोबर २०२२ मध्ये रोजगार मेळावा सुरू केला होता. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आतापर्यंत ३ लाखांहून अधिक तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी या मेळाव्याद्वारे जास्तं तरुणांना नोकऱ्या देऊन, लोकप्रियता मिळवण्याची केंद्र सरकारची योजना आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड